Kolhapur- ‘सीपीआर’मधील औषध घोटाळा: 'राजेश क्षीरसागरांच्या विरोधात न्यायालयात जाणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 03:58 PM2024-09-21T15:58:08+5:302024-09-21T15:58:28+5:30
..तर क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घ्यावी
कोल्हापूर : ‘सीपीआर’मध्ये घेण्यात आलेल्या पाच कोटी रुपयांच्या ड्रेसिंग मटेरिअलप्रकरणी राजेश क्षीरसागर, ठेकेदार मयूर लिंबेकर आणि त्यांना मदत करणाऱ्या डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करा; अन्यथा आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उद्धवसेनेचे शहरप्रमुख रवी इंगवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
इंगवले म्हणाले, सीपीआरला गरज नसताना हे मटेरिअल खरेदी करण्यासाठी क्षीरसागर यांनी पत्र दिले. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्याला मंजुरी दिली. ‘सीपीआर’मधील डॉक्टरांना या प्रकरणात मदत केली. या खरेदीमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार दिसून येत आहेत, असा स्पष्ट अहवाल वैद्यकीय संचालकांनी दिला आहे. मग या सर्वांवर कारवाई का होत नाही? ही कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे. याबाबत निर्णय झाला नाही तर मात्र न्यायालयात जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.
पत्रकार परिषदेला विजय देवणे, नियाज खान, मंजित माने, सागर साळोखे, हर्षल पाटील, किरण पडवळे, धनाजी दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
..तर क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घ्यावी
या प्रकरणामध्ये आपला काहीही संबंध नाही, असे जर क्षीरसागर यांना वाटत असेल तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तसे जाहीर करावे. मी त्याच पत्रकार परिषदेत येऊन माझी बाजू मांडतो; त्यांनी त्यांची बाजू मांडावी, असे आव्हान इंगवले यांनी दिले.