‘गोकुळ’च काय सर्वच निवडणुकीत युनिटी राहणार : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:38 AM2020-12-12T04:38:39+5:302020-12-12T04:38:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाविकास आघाडी ताकदीने उतरल्यानंतर काय होते, हे या निवडणुकीने विरोधकांना दाखवून दिले. ‘गोकुळ’च काय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाविकास आघाडी ताकदीने उतरल्यानंतर काय होते, हे या निवडणुकीने विरोधकांना दाखवून दिले. ‘गोकुळ’च काय येणाऱ्या सर्वच निवडणुकीत ही युनिटी कायम राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
नूतन आमदार अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे प्रमुख उपस्थित होते. आघाडीतील प्रत्येक घटक एकसंधपणे राबल्याचे फळ मिळाल्याचे सांगत आगामी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक व ‘गोकुळ’ची निवडणूक ही आघाडी कायम राहावी, अशी अपेक्षा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली. हाच धागा पकडत पालकमंत्री पाटील म्हणाले, धैर्यशील, तुम्ही राजाराम साखर कारखान्याच्या मागील निवडणुकीत आमच्या सोबत असता तर त्याचवेळी कारखाना ताब्यात आला असता. आता हातात हात घालून काम करायचे आहे, ‘गोकुळ’च काय सर्वच निवडणुकीत ही युनिटी कायम राहणार.
शिवसेनेची नाराजी अन् मुश्रीफ यांचा सल्ला
शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने तुम्ही दोघे निवडून आलात, त्याचा आम्हाला आनंद आहे. निवडून आल्यानंतर मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील यांचे आभाराचे फोन आले, मात्र जिल्हाप्रमुख म्हणून एक फोन करणे अपेक्षित होते. अशी नाराजी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केली. यावर, दोघांनी एक दिवस बाजूला काढून सर्वांच्या भेटी घेण्याचा सल्ला मंत्री मुश्रीफ यांनी दिला.
राजेश पाटील यांचा इशारा
‘बरं पेक्षा खरं बोलण्याची शिकवण स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व नरसिंगराव पाटील यांनी आम्हाला दिली. निवडणुकीत आमचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे राबले, त्यांची कामे व्हावीत. नाही तर सहा वर्षांनंतर आपल्याबद्दल पुन्हा विचार करायला लावू नका,’ असा इशाराच आमदार राजेश पाटील यांनी दिला.
चांगल्या दिवशी चंद्रकांत पाटीलांचे नाव नको
सत्काराचा चांगला दिवस असल्याने आज चंद्रकांत पाटील यांचे नाव घेणार नाही. मात्र, अनेक वेळा आपण सांगत आलोय, सत्तेची सूज जास्त दिवस टिकत नाही. जिवाभावाची माणसं तयार करण्यासाठी आयुष्य वेचावे लागते. कोणीही उठून पैसे देऊन अशी माणसे तयार होत नसल्याचा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.
- राजाराम लोंढे