‘चिकोत्रा’च्या गेटची त्वरित गळती काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:52 PM2017-08-13T23:52:31+5:302017-08-13T23:52:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पांगिरे : आज, सोमवार दि. १४ पासून यांत्रिकी विभागामार्फत कामास सुरुवात करून येत्या आठ दिवसांत युद्धपातळीवर काम करून चिकोत्रा धरणाच्या सर्व्हिस गेटला लागलेली गळती थांबविण्याचे आश्वासन पाटबंधारे खात्याचे पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत देशमाने यांनी दिले.
चिकोत्रा खोºयातील सुमारे ५२ गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी वरदायी ठरलेले चिकोत्रा धरण भरण्यासाठी अनेक ठिकाणचे वाया जाणारे पाणी धरणामध्ये वळवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच धरणामध्ये सध्या साठलेले पाणी धरणाच्या सर्व्हिस गेटलाच मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून वाया जात असल्याचे 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. याबाबीची गंभीर दखल घेत आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिकोत्रा धरणस्थळावर गणेश मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे हे होते.
सुरुवातीस पॉवर हाऊसच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस गेटच्या ठिकाणी जाऊन गळतीची पाहणी करण्यात आली. यावेळी गळती मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले.
एकीकडे म्हातारीचे पठार तसेच दिंडेवाडी परिसरातील ओढ्याचे वाया जाणारे पाणी चिकोत्रा धरणात वळविण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु असतानाच धरणाच्या सर्व्हिस गेटला असलेल्या गळतीचे भीषण वास्तव समोर आले आहे. गेली तीन वर्षांपासून धरणाच्या सर्व्हिस गेटलाच गळती सुरु असून ही गळती अद्याप काढण्यास पाटबंधारे विभागास यश आलेले नाही. गेली तीन वर्षांपासून या सर्व्हिस गेटची गळती काढण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करीत आहे. तसेच सर्व्हिस गेटमधून जे पाणी सध्या बाहेर पडते ते पाणी सिमेंटकाँक्रीटद्वारे बांधण्यात आलेल्या कनॉलमधून पुढे नदीपात्रात जाते. पण सध्या या कनॉलची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, हे पाणी नदीपात्रात सरळ वाहून न जाता कनॉलमधून गळतीद्वारे जमिनीत मुरले जात आहे. त्यामुळे कनॉलची गळती काढणे गरजेचे बनले असल्याचे उपतालुकाप्रमुख अशोक पाटील यांनी सांगितले .
गेली तीन वर्षांपासून ही गळती सुरू असून पाटबंधारे विभागाने त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करत धरणातील प्रति सेकंदाला १५ लिटर याप्रमाणे दररोज साधारणत: १३ लाख लिटर्स पाणी वाया जात असल्यामुळे सदर गळतीचे काम वेळीच केले नाही, तर धरणात सध्या साठा झालेले पाणी वाहून वाया जाऊन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. तेव्हा पाटबंधारे विभागानेही सर्व्हिस गेटच्या पाणी गळतीची बाब गांभीर्यीने घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली.
धरणस्थळावर वीज नाही, त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते, धरण सुरक्षिततेच्यादृष्टीने खासगी सुरक्षारक्षक नेमून धरणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच धरणाच्या पिचिंवरील झाडेझुडपे तोडावीत, अशी सूचना उमेश देसाई यांनी मांडली. तसेच हिरण्यकेशी नदीचे पाणी कनॉल काढून दाभिल-देवकांडगाव-वझरेमार्गे चिकोत्रा धरणात आणल्यास चिकोत्राचा पाणीसाठा वाढण्यास मदत होईल त्यादृष्टीने सर्व्हे झाला असल्याचे गणपतराव शेटके यांनी निदर्शनास आणून दिले .
यावेळी बोलताना आमदार प्रकाश अबिटकर म्हणाले, पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाने कोणत्याही परिस्थितीत सर्व्हिस गेटच्या गळतीचे काम आठ दिवसांत पूर्ण करणे गरजेचे आहे या बैठकीस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, भिकाजी हळ्दकर, अशोक पाटील, महादेव परीट, गोविंद सुर्वे, सदाशिव पाडेकर, दत्तात्रय परीट, निवृत्ती भाटले, राजेंद्र भारमल, तानाजी पाटील, राजाराम भराडे, मारुती भराडे, बाळासो पाटील, शिवराम खवरे, मारुती पाटील, शिवाजी पाटील, सागर मिसाळ, जोतिराम कांबळे, नारायण शेवाळे, आनंदा तिप्पे, केरबा घुरे, आनंदा भाईंगड,े बाळासो चव्हाण, सुधीर शिंदे, सागर गुरव उपस्थित होते. आभार विद्याधर परीट यांनी मानले.
पुणे यांत्रिकी विभागाची टीम काम करणार
सर्व्हिस गेटची गळती काढण्यासाठी पाटबंधारे खात्याची पुणे यांत्रिकी विभागाची टीम काम करणार आहे. ही गळती काढण्यासाठी गेट बाहेर काढावे लागणार आहे. सर्व्हिस गेट व इमर्जन्सी गेट उघडून हे काम करण्यास आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे. यावेळी ८० टक्के गळती काढण्यात यश येईल. उर्वरित गळती काढण्याचे काम १५ नोव्हेंबरनंतर पाण्याचे रोटेशन सुरु झाल्यानंतर मेन गेटवर काढूनच करावे लागणार असल्याचे पुणे विभागाचे अभियंता प्रशांत देशमाने यांनी यावेळी सांगितले.