‘एमपीएससी’साठी वयोमर्यादा वाढविणार
By admin | Published: September 13, 2015 12:16 AM2015-09-13T00:16:18+5:302015-09-13T00:16:18+5:30
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : राजू शेट्टी यांची मागणी; माहिती जमा करण्याचे आदेश
कोल्हापूर : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची वयोमर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासन नक्की विचार करील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टी यांना लेखी पत्राद्वारे दिले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व माहिती जमा करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
शेट्टी यांनी त्या संदभातील पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. सध्या ही परीक्षेसाठी वयोमर्यादा खुल्या गटातील उमेदवारांसाठी ३३ व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३८ आहे. त्यानुसार खुल्या जागेवरील उमेदवारांची वयोमर्यादा ४० पर्यंत वाढवावी, असे शेट्टी यांचे म्हणणे होते.
वयोमर्यादा वाढविण्याच्या या मागणीबद्दल स्पर्धा परीक्षेसंबंधी जाणकार व प्रत्यक्ष उमेदवारांतून मात्र उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. साधारणत: कोणताही तरुण वयाच्या २१ व्या वर्षी पदवीधर होतो. त्यास पुढे चार-पाच वर्षे प्रयत्न करून या परीक्षेत उत्तीर्ण होता येते. त्याने पदवीधर झाल्यानंतर वीस वर्षांनंतर नोकरी लागणार असेल तर हा कालावधी खूप मोठा आहे. चाळिसाव्या वर्षी नोकरी लागल्यावर काम समजून घ्यायलाच त्याला चार-पाच वर्षे लागतात. त्यानंतर पंधरा वर्षांत तो निवृत्त होणार असतो. प्रत्यक्ष सेवेचा कालावधी कमी मिळणार असल्याने त्यातून भ्रष्टाचाराची प्रवृत्ती जास्त वाढीस लागेल अशी भीती व्यक्त होत आहे. खुल्या प्रवर्गातील वय ४० केल्यास आरक्षित प्रवर्गाची वयोमर्यादा ४५ होईल. त्यांना तर सेवेची फक्त १५ वर्षेच मिळतील. पोलीस खात्यामध्ये फौजदारास स्वतंत्र पोलीस ठाणे मिळण्यास १५ वर्षे लागतात. याचाही विचार वयोमर्यादा वाढविताना व्हावा. ३३ वय वाढवलेच तर ३५ पर्यंत करता येऊ शकेल. शिवाय जे तरुण या परीक्षेत यशस्वी होतात, ते पहिल्या दोन-तीन प्रयत्नांत होतात आणि जे अनुत्तीर्ण होतात त्यांना वारंवार प्रयत्न करूनही त्यात यश मिळत नाही. त्यामुळे वयोमर्यादा वाढविली म्हणजे तरुणांना त्यामध्ये जास्त संधी मिळेल, ही शक्यताही धूसर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)