Kolhapur- जोतिबा डोंगर विकासाचं 'चांगभलं': मंदिर 'देवस्थान'पासून वेगळे होणार का ? कशी असेल प्राधिकरणाची रचना
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 20, 2025 15:46 IST2025-03-20T15:46:29+5:302025-03-20T15:46:57+5:30
योग्य पुनर्वसनाची ग्रामस्थांची अपेक्षा

जोतिबा डोंगरावर महाराष्ट्रातील भाविक येऊन देवाचे कुलाचार, धार्मिक विधी करतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
इंदुमती गणेश
कोल्हापूर : जोतिबा मंदिर विकास प्राधिकरण झाल्यानंतर जोतिबा मंदिर स्वतंत्र होणार का, येथे स्वतंत्र समिती पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार का, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मंदिरावर अधिपत्य असणार की नाही, पूजेसंबंधीच्या गुरवांच्या हक्कांना बाधा येणार का, असे अनेक प्रश्न प्राधिकरणच्या निमित्ताने तयार झाले आहेत. जोतिबा मंदिर हे बहुजनांचे दैवत आहे, अठरा पगड जातीचे भाविक आमच्याकडे शिधा देतात, नैवेद्य पाेटभर खाऊन तृप्त मनाने जातात. यावर आमचा उदरनिर्वाह आहे. विकासाला विरोध नाही, फक्त परंपरा, धार्मिक विधी, कुलाचाराला आणि व्यवसायाला बाधा येऊ नये, योग्य पुनर्वसन व्हावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थांची संख्या ५ ते ६ हजारांच्या आसपास आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने आता तिथे प्रशासक आहेत. डोंगरावर ८० टक्के लोक पुजारी आहेत. त्यांच्याकडे विविध भागातून भाविक शिधा घेऊन येतात. पुजाऱ्यांनी केलेला नैवेद्य देवाला दाखवतात, जेऊन आपल्या गावी परततात. हे पौरोहित्य आणि भाविकांना सोयी-सुविधा, पूजेच्या साहित्यांची विक्री हाच येथील गुरव समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. प्राधिकरण झाल्यानंतर आमच्या या हक्कांवर बाधा येणार नाही ना, या ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय आहे.
एकत्र बैठक घ्या
तिरुपतीप्रमाणे या मंदिराचेही व्यावसायिकीकरण झाले तर काय? मूळ स्थानिकांनाच बाहेर काढून उपऱ्यांना व्यवसायाची परवानगी दिली गेली, तर आम्ही कुठे जायचे, काय खायचे. कोणता व्यवसाय करायचा अशा अनेक शंका ग्रामस्थांमध्ये आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची एकत्र बैठक घेऊन त्यांच्यासमोर जोतिबा आराखडा सादर करावा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, शंकांचे निराकरण करावे, त्यांनी सुचवलेले संयुक्तिक बदल करून आराखडा पुढे राबवता येईल.
मंदिर स्वतंत्र करून अध्यक्षपद एकास देण्याची चर्चा
राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने कार्यकर्त्यांना पदे देऊन मुरवायचे कुठे, असा प्रश्न नेत्यांना पडला आहे. जोतिबा प्राधिकरण झाले की, अध्यक्षांपासून पदाधिकारी, सदस्यांची समितीच स्वतंत्र होणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे त्याचे अधिकार असणार नाहीत. जोतिबा मंदिर स्वतंत्र करून त्याचे अध्यक्षपद एका पक्षाला द्यायचे अशाही चर्चा सुरू असल्याचे समजते. प्राधिकरणचे कामकाज स्वतंत्रपणे चालेल.
वनखात्याचे उत्तम काम
या भागात वनखात्याने उत्तम काम केले असून वृक्षसंपदा वाढली आहे. माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांच्या ३ कोटी निधीतून कल्पवृक्ष तलावाचे संवर्धन झाले आहे. पण, डोंगरावरील अन्य ७ तलावांचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यांचे संवर्धन झालेले नाही.
विकासाला विरोध नाही. पण, जोतिबावरील ८० टक्के ग्रामस्थ मंदिरावर अवलंबून आहेत. मंदिराचा विकास व्हावा, पण परंपरा खंडित होऊ नये. स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून त्यांना विश्वासात घेऊन आराखडा राबवला गेला, तर सर्वांचे सहकार्यच असेल. पण, विकासाच्या नावाखाली व्यावसायिकरण आणि स्थानिकांनाच बेरोजगार करू नये. - नवनाथ लादे, जोतिबा हक्कदार समिती