नेत्यांचा फुगा फुगणार की फुटणार?
By admin | Published: January 24, 2017 12:40 AM2017-01-24T00:40:39+5:302017-01-24T00:40:39+5:30
शिरोळ तालुका : नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांपुढे जि. प. व पं. स. निवडणुकीचे आव्हान
गणपती कोळी --कुरुंदवाड -जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिरोळ तालुक्यातील कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेशापूर्वी काहींनी पदाची अपेक्षा ठेवल्याने व पक्षाकडून पद देण्याचे आमिष दाखविल्याने त्यांनी प्रवेश केला. आचारसंहितेत आश्वासने अडकल्याने भाजपचा जीव भांड्यात पडला आहे.
गाजावाजा करून प्रवेश केलेल्या या नेत्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपली ताकद सिद्ध करण्याचे आव्हान आहे. त्यामध्ये ते कितपत यशस्वी होतात, यावरच नव्या पक्षातील त्यांच्या अस्तित्वाबरोबर त्यांनी मागणी केलेल्या लाभाच्या पदाचा विचार होणार आहे. त्यामुळे या नेतेमंडळींची ही निवडणूक परीक्षाच ठरणार असून, या नेत्यांचा फुगा फुगणार की फुटणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
केंद्र व राज्यात भाजप सरकार असल्याने जिल्ह्यातील कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळींनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रामुख्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. यामध्ये शिरोळ तालुकाही मागे राहिला नाही. पक्षात राहूनही बहुजन विकास आघाडीच्या नावाखाली स्वत:च्या अस्तित्वाची ताकद दाखविणारे शिरोळ तालुका राष्ट्रीय कॉँग्रेसचे अध्यक्ष अनिलराव यादव, जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते
विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, मागासवर्गीय सूतगिरणीचे संस्थापक अशोकराव माने, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष धनाजीराव जगदाळे, विजय भोजे, आदी नेतेमंडळी भाजपच्या गळाला लागले आहेत.
अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा होती. मात्र, प्रवेश करताना पक्षात काही ना काही पदरात पाडून घ्यायचे, या उद्देशाने प्रवेश रेंगाळला होता. अखेर त्यांना पक्षात घेण्यात भाजपची नेतेमंडळी यशस्वी झाल्याने दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नेतेमंडळींचा प्रवेश झाला आणि त्यांच्या प्रवेशाने तालुक्यात भाजप ‘वजनदार’ झाल्याची चर्चा सुरू झाली.
पक्षप्रवेश केलेल्या नेतेमंडळींना या निवडणुकीत आपली ताकद दाखवावी लागणार आहे. तालुक्यात सात जिल्हा परिषद व चौदा पंचायत समिती मतदारसंघ आहेत. यामध्ये किमान ४० टक्के यश मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
‘काटा’ काढण्याची संधी
शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने या जागेवर दलितमित्र अशोकराव माने यांना भाजपची उमेदवारी निश्चित मानली जाते. बहुजन विकास आघाडीतील बहुतेक मंडळी भाजपमध्ये गेल्याने त्यांचा ‘काटा’ काढण्याची संधी कॉँग्रेस, राष्ट्रवादीला आहे, तर भाजप ‘स्वाभिमानी’त फूट पाडण्याचा डाव आखत असल्याने खासदार राजू शेट्टी भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे शिरोळमधून भाजपला रोखण्यासाठी ऐनवेळी कॉँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी एकत्र येण्याच्या हालचाली चालू आहेत.