मराठी श्रेष्ठ साहित्य अखिल भारतीय बनवणार
By admin | Published: March 28, 2017 03:46 PM2017-03-28T15:46:49+5:302017-03-28T15:46:49+5:30
विनोद तावडे; सुनीलकुमार लवटे ‘अखिल भारतीय महाराष्ट्र भारती’ पुरस्काराने सन्मानित
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : मराठी श्रेष्ठ साहित्याची भाषांतरे भारतीय भाषांत करुन ते अखिल भारतीय बनवणार आहे, असे प्रतिपादन शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईमध्ये केले.
हिंदी अकादमीतर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात मंत्री तावडे यांच्या हस्ते लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे यांना अहिंदी भाषी हिंदी साहित्यिक श्रेणीतील अखिल भारतीय महाराष्ट्र भारती पुरस्कार- २०१५ प्रदान करण्यात आला. १ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हिंदी वेब साहित्य, मराठी साहित्याची हिंदी भाषांतरे, वि. स. खांडेकरांच्या अप्रकाशित, असंकलित साहित्याच्या २५ ग्रंथाच्या संपादनाचा बृहद प्रकल्प, हिंदी अभ्यासक्रमात मौलिक लेखनाद्वारे योगदान, आदी स्वरुपातील कार्याची नोंद घेवून डॉ. लवटे यांचा शासनाने या पुरस्काराने सन्मान केला.
मंत्री तावडे म्हणाले, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीमार्फत येथून पुढे केवळ हिंदी-मराठी भाषांतर कार्य न होता सर्व भारतीय भाषांत आदान-प्रदान करुन मराठी साहित्य अखिल भारतीय स्तरावर पोहचविण्याचे कार्य केले जाईल.
कार्यक्रमात डॉ. सूर्यबाला, देवेश ठाकूर, माधुरी छेडा, वेदकुमार वेदालंकार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी हिंदी अकादमीचे कार्याध्यक्ष डॉ. नंदलाल पाठक, माजी मंत्री राज पुरोहित, सांस्कृतिक संचालक संजय पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)