नगराध्यक्ष आरक्षण प्रश्न सुटणार ?
By admin | Published: September 30, 2016 12:23 AM2016-09-30T00:23:15+5:302016-09-30T01:37:33+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संकलन : सध्या असणाऱ्या आरक्षणाची घेतली माहिती
जयसिंगपूर : आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नगरपालिकेकडे असलेल्या नगराध्यक्ष आरक्षणाची माहिती बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविली. जिल्ह्यातील सर्वच पालिकांची माहिती मागविण्यात आल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. त्यामुळे नगराध्यक्ष आरक्षणप्रश्नी भिजत पडलेला प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. सध्या राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवारी (दि. २६) मतदार याद्या प्रसिद्ध केल्या असून, त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत. १५ आॅक्टोबरला मतदार याद्या अंतिम करून त्या निश्चित करण्यात येणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना, आरक्षण यापूर्वी जाहीर झाले आहे.
दरम्यान, थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार ही घोषणा यापूर्वीच जाहीर झाली होती. मात्र, नगराध्यक्षपदाची निवडणूक जनतेतून अथवा नगरसेवकांतून होणार, हा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. यामुळे राष्ट्रीय पक्ष व आघाड्यांच्या स्तरावर गोंधळाचे वातावरण आहे. राज्य सरकारने जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचे जाहीर केले होते. मात्र, यापूर्वी झालेली आरक्षण सोडत तशीच राहणार की नव्याने आरक्षण सोडत होणार, याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे.
मतदार याद्या कार्यक्रमाबरोबरच मतदान केंद्र निश्चितीकरण याची घाईगडब
ड सुरू असतानाच बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने सध्या नगरपालिकेकडे नगराध्यक्ष म्हणून कार्यभार असलेल्या आरक्षणाची माहिती तातडीने मागविली असल्याचे वृत्त आहे. मात्र, यापूर्वीच जिल्ह्यातील सर्वच पालिकांनी सध्या असलेल्या आरक्षणाची माहिती दिली होती. एकूणच सध्या पालिकेकडे नगराध्यक्ष असलेल्या आरक्षणाची माहिती पुन्हा मागविल्याने आरक्षणाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असल्या, तरी नगराध्यक्षपद आरक्षणाबाबत नेमके काय होणार, याकडेच इच्छुकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
पंचायत समितीच्या १४ जागांसाठी सोडत
शिरोळ : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना कार्यक्रमानंतर आता इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ५ आॅक्टोबरला सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात येणार असून, शिरोळ येथील महसूल भवन कार्यालयात ही सोडत काढण्यात येणार आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी १६ ऐवजी १४ पंचायत समितींचे मतदारसंघ (गण) निश्चित करण्यात आले आहेत. संभाव्य गणाप्रमाणे दानोळी, कोथळी, उदगाव, अर्जुनवाड, गणेशवाडी, आलास, शिरोळ, अकिवाट, नांदणी, यड्राव, शिरढोण, अब्दुललाट, दत्तवाड, टाकळी या चौदा मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे आठ ऐवजी सात गट निश्चित करण्यात आले आहेत. त्याची आरक्षण सोडत कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.