पगार वेळेत मिळाला नाही तर तक्रार करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 11:22 AM2021-08-04T11:22:56+5:302021-08-04T11:24:58+5:30
CoronaVirus Doctor CprHospital Kolhapur: एक तर पाच महिन्यांचा अजूनही पगार दिलेला नाही. उलट जर पुढे पुन्हा चार महिन्यांची नोकरी हवी असेल तर पगार वेळेत मिळाला नाही म्हणून तक्रार करणार नाही, असे लेखी हमीपत्र मागण्याचा उद्दामपणा राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने केला आहे. विनापगार चार महिने काम करणाऱ्या डॉक्टरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे.
कोल्हापूर : एक तर पाच महिन्यांचा अजूनही पगार दिलेला नाही. उलट जर पुढे पुन्हा चार महिन्यांची नोकरी हवी असेल तर पगार वेळेत मिळाला नाही म्हणून तक्रार करणार नाही, असे लेखी हमीपत्र मागण्याचा उद्दामपणा राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने केला आहे. विनापगार चार महिने काम करणाऱ्या डॉक्टरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे.
वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालय येथील ५८ वैद्यकीय अधिकारी आणि सहायक प्राध्यापक यांना गेले पाच महिने पगार नाही. याबाबत मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन झाली आहेत.
१६ जुलै रोजी या सर्व डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळी नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांनी या सर्वांशी चर्चा करून लवकर पगार करण्याची ग्वाही दिली होती. ते स्वत: वैद्यकीय सचिवांशी बोलले होते. तरीही पगार झालेला नाही. केवळ काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एका महिन्याचा पगार करण्यात आला आहे.
यातील काही डॉक्टरांनी मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. पुन्हा रेखावार यांनी आश्वासन दिले आहे. मात्र, याबाबत काहीही ठोस निर्णय झालेला नाही. दुसरीकडे यातील दोन, तीन डॉक्टरांचे चार महिन्यांचे कंत्राट संपत आले आहे.
पुन्हा नवीन आदेश घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना लेखी हमीपत्र देण्यास सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये पगार वेळेवर मिळाला नाही तर तक्रार करणार नाही, असे लेखी द्यावे लागणार आहे.
हमीपत्राचा नमुना
कंत्राटी सेवा १० च्या उद्दिष्टांतर्गत अनुदान प्राप्त झाल्यानंतर मला वेतन व भत्ते अदा करण्यात येतील याची मला पूर्ण कल्पना आहे. अनुदान उपलब्ध होण्यास विलंब झाल्यास माझे वेतन व भत्ते वेळेत न मिळाल्यास याबाबत कोणतीही तक्रार मी करणार नाही. अनुदान उपलब्ध झाल्यानंतर मला वेतन अदा करण्यास माझी कोणतीही हरकत नाही. वेतन मिळण्याबाबत कार्यालयाकडे मी वारंवार विचारणा करणार नाही, अशी हमी देत आहे.
अजित पवारांचे आश्वासन गेले वाहून
दहा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. ज्यावेळी डॉक्टरांना चार महिने कोरोना काळात काम करत असतानाही पगार नाही असे सांगितले तेव्हा त्यांनी चारच दिवसात पगार होतील, अशी ग्वाही दिली होती; परंतु मधल्या आलेल्या महापुरात पवारांचे आश्वासन वाहून गेले. कारण जुलै पाचवा महिना संपला तरी या डॉक्टरांना पगार मिळालेला नाही.