...तर दादांना ध्वजारोहण करू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2016 01:00 AM2016-04-04T01:00:14+5:302016-04-04T01:00:14+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात राजू शेट्टी यांचा इशारा

... will not let the flag be flagged off | ...तर दादांना ध्वजारोहण करू देणार नाही

...तर दादांना ध्वजारोहण करू देणार नाही

Next

कोल्हापूर : सरकारवर विश्वास ठेवून आम्ही ८०:२० फॉर्मुल्यावर विश्वास ठेवला. साखरेने ३५०० रुपयांचा टप्पा पार करूनही कारखानदार एफआरपीमधील २० टक्के देण्यास टाळाटाळ करत आहेत. १५ एप्रिलपर्यंत ही रक्कम दिली नाही आणि सरकार बघ्याची भूमिका घेणार असेल, तर १ मे ला महाराष्ट्र दिनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ‘एफआरपी’ तर द्यावी लागेलच, पण रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार उत्पन्नातील ७५ टक्के हिश्श्यासाठी आता रस्त्यावरची लढाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘एफआरपी’बाबत कारखानदार व सरकारची भूमिका व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी कोल्हापुरात ‘स्वाभिमानी’चा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी भगवान काटे होते. खासदार शेट्टी म्हणाले, दराबाबत ८०:२० टक्क्यावर तडजोड केली, ती कायमस्वरूपी नव्हती. साखरेचा दर तीन हजारांच्या वर गेल्यानंतर व्याजासह पैसे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मेळावा घेणार म्हटल्यावर साखर आयुक्तांनी बैठक घेऊन २० टक्क्यासाठी १५ एप्रिलची डेडलाईन दिली. कारखानदारांनी जिल्हा बँकेत बैठक घेऊन त्याला खोडा घातला. १५ एप्रिलपर्यंत एफआरपीतील २० टक्के दिले नाहीत, तर सहकारमंत्र्यांनी साखर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अन्यथा त्यांना महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करू देणार नाही. साखरेचे दर वाढल्याने एफआरपी प्रमाणे पैसे घेणारच, पण रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार उत्पन्नातील ७५ टक्के हिश्श्यासाठी रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
सहकारमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवत सदाभाऊ खोत म्हणाले, साखरेच्या भाववाढीमागे ‘स्वाभिमानी’चे प्रयत्न आहेत. २० टक्क्यासाठी कारखानदार आढेवेढे घेत आहेत, घामाचे दाम देणार नसाल तर हात बांधून घरात बसणार नाही, ५० हजारांची फौज घेऊन रस्त्यावर उतरू. वर्मी घाव घातल्यानंतर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशाराही खोत यांनी दिला.
दरम्यान, स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवार (दि. ७) पासून दोन दिवस पिंपळगाव (जि. नाशिक) येथे होत आहे. यामध्ये दुष्काळासह विविध विषयांवर चर्चा होणार असून संघटनेत नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे संकेत खोत यांनी दिले. यावेळी जालंदर पाटील, वैभव कांबळे, तानाजी देसाई, अनिल मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, भगवान काटे यांनी मनोगत व्यक्त केले. अण्णासाहेब चौगुले, विठ्ठल मोरे, संदीप राजोबा, सुभाष शेट्टी, सुरेश कांबळे, जयकुमार कोले, आदी उपस्थित होते.
बिनशिक्क्याच्या पोत्यासाठी भरारीपथक!
कारखानदार काटा मारतात, यासाठी वजनकाटेच आॅनलाईन करण्याची मागणी सरकारकडे करत आहे. रिकव्हरी मारण्याचा उद्योगही सुरू असून बिनशिक्क्याच्या पोत्यात साखर भरून काळ्या बाजारात विकली जात आहे, यावर नजर ठेवण्यासाठी परिसरातील कार्यकर्त्यांचे भरारीपथक नेमणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
मुश्रीफसाहेब, कागलच्या हातशिल्लकचे काय?
जिल्हा बॅँकेतील खातेदारांकडून सक्तीने ११.४५ रुपये महिन्याला वसूल केले जातात. यासाठी बॅँकेवर धडक देऊ, बॅँक अडचणीत आहे म्हणून शेतकऱ्यांचे खिशे कापणार का? मुश्रीफसाहेब, कागल शाखेतील हातशिल्लक पळवली नसती तर अशा वसुलीचे काम करावे लागले नसते, असा टोला शेट्टी यांनी हाणला.
म्हणूनच पवारांची कावीळ!
जुलैमध्ये साखरेचे दर १९०० रुपये असताना व भविष्यात दर वाढणार हे माहिती असताना दुबळ्या व आजारी कारखान्यांना कोणी साखर विकण्यास सांगितली. आता ३८०० रुपये दर असताना साखर का विकत नाहीत. या कटाचा सूत्रधार कोण याची चौकशी सहकारमंत्र्यांनी करावी. यासाठीच शरद पवार यांची कावीळ झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
केंद्राचे ४५ रुपये अनुदान प्रोत्साहनासाठीच
साखर निर्यात करणाऱ्यांना केंद्र सरकार ४५ रुपये प्रतिटन प्रोत्साहन अनुदान देणार आहे. हे अनुदान वजा करून एफआरपी देण्याचा डाव कारखानदारांचा आहे. एफआरपीमधील एक रुपयाला जरी हात लावाल तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

Web Title: ... will not let the flag be flagged off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.