नागरिकत्व सिद्ध करणार नाही, खुशाल छळछावणीत टाका : कुमार सप्तर्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 05:29 PM2019-12-27T17:29:05+5:302019-12-27T17:33:58+5:30
कोणतीही जात-धर्म न मानता देशात सन्मानाने जगण्याचा अधिकार घटनेने दिला असताना नागरिकत्व सिद्ध करण्याचा काढलेला फतवा ही मनुवादी केंद्र सरकारची मनमानी आहे. राज्यघटनेच्या आधीच्या जंजाळात अडकायचे की घटनेने दिलेल्या मार्गावरून पुढे चालायचे, हे निवडण्याची वेळ आली आहे. मी कोणतीही कागदपत्रे देणार नाही, मला खुशाल छळछावणीत टाका, असे आव्हानच ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिले.
कोल्हापूर : कोणतीही जात-धर्म न मानता देशात सन्मानाने जगण्याचा अधिकार घटनेने दिला असताना नागरिकत्व सिद्ध करण्याचा काढलेला फतवा ही मनुवादी केंद्र सरकारची मनमानी आहे. राज्यघटनेच्या आधीच्या जंजाळात अडकायचे की घटनेने दिलेल्या मार्गावरून पुढे चालायचे, हे निवडण्याची वेळ आली आहे. मी कोणतीही कागदपत्रे देणार नाही, मला खुशाल छळछावणीत टाका, असे आव्हानच ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिले.
व्ही. टी. पाटील स्मृतिभवनाच्या सभागृहात ताराराणी विद्यापीठाच्या वतीने क्रांतिवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेअंतर्गत ‘आधुनिक भारताची बांधणी’ या विषयावर डॉ. सप्तर्षी यांनी शुक्रवारी विचारपुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील होते.
सप्तर्षी म्हणाले, मनुस्मृतीला अपेक्षित राज्यकर्ते सध्या केंद्रात सत्तेवर आहेत. ते जे बोलतील तेच प्रमाण आणि तेच अंतिम असा कारभार सध्या सुरू आहे. कोणत्याही चर्चेविना निर्णय लादले जात आहेत. बहुमत हे स्थिरतेचे लक्षण असते; पण हेच पाशवी बहुमत देशासाठी काळ बनू पाहत आहे. आता जनतेनेच शहाणे होण्याची गरज आहे.
भूतकाळातील व्यवस्था एका बाजूला आणि गांधीवादी विचारसरणी दुसऱ्या बाजूला, अशी विभागणी झाली असून, देशासाठी काठावरची भूमिका घेऊन चालणार नाही. मनुस्मृतीपासून फारकत घेऊन राज्यघटनेपर्यंत पोहोचण्याचा मार्गच स्वीकारावा लागणार आहे. गांधी यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्यातच देशाचे भले आहे.
शाहीर आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला. सुजय पाटील यांनी परिचय करून दिला. एम. डी. चव्हाण यांनी आभार व सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव प्राजक्त पाटील यांच्यासह विद्यार्थिनी व शिक्षकांची उपस्थिती होती.