नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगीच्या घोषणात महाराष्ट्र एकीकरण समितीची कोल्हापूरात निदर्शने, ३५ कार्यकर्ते ताब्यात,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:35 PM2018-01-23T13:35:42+5:302018-01-23T17:35:21+5:30

नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी समजावून सांगूनही दादांच्या निवासस्थानीच आंदोलन करण्याचा हट्ट कायम ठेवल्याने बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह समितीच्या ३५ कार्यकर्त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले.

Will not run, will not run, Kolhapur demonstrations of Maharashtra Integration Committee, 35 activists in custody, | नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगीच्या घोषणात महाराष्ट्र एकीकरण समितीची कोल्हापूरात निदर्शने, ३५ कार्यकर्ते ताब्यात,

नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगीच्या घोषणात महाराष्ट्र एकीकरण समितीची कोल्हापूरात निदर्शने, ३५ कार्यकर्ते ताब्यात,

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रकांतदादांच्या निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्नबेळगावच्या माजी महापौरांसह तीन महिला कार्यकर्त्याही ताब्यातनही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगीच्या घोषणामहाराष्ट्र एकीकरण समितीची कोल्हापूरात निदर्शने, ३५ कार्यकर्ते ताब्यातसीमालढ्यातील आंदोलक पोलिसांच्या ताब्यातनिदर्शने करत पालकमंत्र्यांच्या घराकडे जाण्याचा आग्रह नडला

कोल्हापूर : ‘आमच्याच मंत्र्यांच्या घरासमोर जाऊ देणार नसाल तर आम्हाला महाराष्ट्रात कसे घेणार,’ अशी विचारणा करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घराकडे जाण्याचा ठाम आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यातील सुमारे ३५ हून अधिक आंदोलकांना मंगळवारी कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी सीमा आंदोलक आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या पालकमंत्री पाटील यांचा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र शब्दांत धिक्कार केला. 

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकाक येथील एका कार्यक्रमात रविवारी कर्नाटक राज्याचे गुणगान गायले होते. त्याचे तीव्र पडसाद सीमाभागात उमटले आहेत. मंत्री पाटील यांच्या विरोधात संताप उसळला आहे. या घटनेचा निषेध करण्याकरिता मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुमारे ३० ते ३५ कार्यकर्ते बेळगांव, निपाणी येथून आले होते. सकाळी साडेअकरा वाजता दहा गाड्यांतून सायबर चौक येथे पोहोचलेले सीमालढ्यातील आंदोलक मोर्चाने संभाजीनगर बसस्थानक परिसरात गेले. 

बसस्थानक परिसरात पोलिसांनी त्यांच्या गाड्या नेल्या. तेथे पावणेबारा वाजता पोलीस अधीक्षक संजय मोहिते व उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी सर्व आंदोलकांची भेट घेतली. त्यांना पालकमंत्री कोल्हापुरात नसून ते मुंबईत असल्याचे त्यांनी सांगितले.

सीमाबांधवांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही तुम्हाला एका ठिकाणी तुम्हाला निदर्शने करण्यास परवानगी देत आहोत. त्याच ठिकाणी निदर्शने करावीत, अशी सूचना मोहिते यांनी केली तर आंदोलकांनी आम्ही थोडा वेळ निदर्शने करणार असून पालकमंत्र्यांच्या घरासमोर आम्हाला जाऊ द्यावे, अशी विनंती केली. त्यावेळी पालकमंत्र्यांच्या घरापासून केवळ १०० मीटर अंतरावर तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हाला पुढे जाता येणार नाही, असे पोलिसांनी त्यांना बजावले. 

शांततेत निदर्शने करत असल्याने तुम्ही चिंता करू नका, असे सांगत आंदोलकांचा पायी मोर्चा सुरू झाला. सुरुवातीला संभाजीनगर झोपडपट्टीजवळ पोलिसांनी बॅरिकेटस् लावून मोर्चा अडविला. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’, ‘बेळगाव- निपाणी-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’, ‘मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो’, ‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, पालकमंत्री राजीनामा द्या’, ‘बेळगावात येऊन कन्नड बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा धिक्कार असो’, ‘मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो,’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 

मोर्चा अडवताच आंदोलक संतप्त व्हायला लागले तसेच पोलिसांनाही ढकलायला लागले; परंतु पोलिसांनी त्यांचा रस्ता रोखला. मंत्र्यांच्या घरापर्यंत सोडणार नसाल तर त्यांनाच येथे बोलवा, अशी विनंती आंदोलक करू लागले.

कर्नाटकचे गुणगान गाण्याआधी मंत्र्यांनी विचार करायला पाहिजे होता. त्यांच्या कुटुंबाला अथवा नागरिकांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. आजवर आम्ही शांततेत आंदोलन केली आहेत. आम्हाला पुढे सोडा; असा आग्रह आंदोलक धरत होते. पोलीस अधीक्षक मोहिते यांनी मात्र वारंवार त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आंदोलकांनी त्यांचे ऐकले नाही.

पोलिसांची फळी भेदून आंदोलक आणखी काही अंतर पुढे गेले. मात्र, दुसऱ्या वळणावर पोलिसांनी मजबूत कडे करून त्यांना रोखले. एकीकडे मंत्र्यांच्या घराकडे जाणाऱ्या आग्रह तर त्यास पोलिसांचा ठाम विरोध झाला. त्यामुळे प्रसंग वादावादीपर्यंत पोहोचला.

गेल्या ६० वर्षांत कधी दंगा केला नाही. आताही करणार नाही त्यामुळे आम्ही घरासमोर जाणारच, असा आंदोलकांचा आग्रह कायम राहिला. त्यावेळी मात्र पोलिसांनी ताब्यात घेण्याचा इशारा दिला. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी आंदोलकांसमोर हात जोडले तेव्हा आंदोलकांनी ‘आतापर्यंत मार खातच आलोय, येथेही मार खाल्ला तर काहीच फरक पडणार नाही, काय करायचे ते करा’ अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

त्यामुळे शेवटी पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस व आंदोलकांदरम्यान काहीशी झटापट झाली. काही आंदोलक रस्त्यावर झोपले. त्यांना अक्षरश: उचलून पोलीस गाड्यांत घातले. तीन महिला कार्यकर्त्या होत्या. त्यांनाही पोलीस जीपमध्ये बसवून पोलीस घेऊन गेले. 



या निदर्शनाचे आंदोलन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या प्रमुख माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, रूपा नावलेकर,मदन बामणे, सूरज कणबरकर, पीयूष हावळ, सुनील बाळेकुंद्री, अमर येल्लूरकर, निपाणीहून आलेले नगरसेवक संजय सांगावकर, प्रशांत नाईक, आर. सी. मोदगेकर, रत्नप्रसाद पवार, श्रीकांत कदम, विक्रम पाटील, राजू मरणे, अजित कोकणे, संजय देसाई, सागर कुंभार आदींनी केले. 

‘दादां’नी जखमेवर मीठ चोळले 

बेळगाव जिल्ह्यात येऊन पालकमंत्र्यांनी कर्नाटकचे गुणगाण गाण्याची काहीच आवश्यकता नव्हती. आम्ही चंद्रकांतदादांना आमचे मंत्री मानतोय. त्यांनी बरेच कामही सीमाबांधवांसाठी केले आहे तरीही त्यांनी गोकाकच्या कार्यक्रमात कर्नाटकाचे गुणगान गात मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे; म्हणूनच त्यांचा धिक्कार करण्यास येथे आलो , अशा भावना सीमालढ्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. 

हुतात्म्यांची घेतली शपथ 

पालकमंत्र्यांच्या घरासमोर आम्हाला निदर्शने करून द्यावीत म्हणून आंदोलक पोलिसांना तासभर विनंती करत होते; परंतु पोलिसांनी त्यांना तसे करू दिले नाही. शंभर मीटरच्या आत सोडणार नाही, अशीच पोलिसांनी भूमिका घेतली. त्यावेळी काही आंदोलकांनी हुतात्म्यांची शपथ घेतली. आम्ही हुतात्म्यांची शपथ घेऊन सांगतो. आम्ही कोणताही दंगा करणार नाही. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधतो. साठ वर्षांत दगड उचललेला नाही. आजही उचलणार नाही पण आम्हाला आमच्या भावना व्यक्त करू द्या; अशी आंदोलक विनंती करत राहिले; पण पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही. 

पोलिसांचीही दडपशाही 

आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक संतप्त झाले. त्यांच्या घोषणाबाजीला जोर चढला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर रेणू किल्लेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी अतिशय बेजबाबदार वक्तव्य केले, त्याचा निषेध करण्याकरिता येथे आलो. पोलिसांनी सुरुवातीला तुम्ही आमचेच आहात असे म्हणत आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेतले. आंदोलन करू दिले नाही. पोलिसांची ही दडपशाही आहे, अशी प्रतिक्रिया रेणू किल्लेकर यांनी व्यक्त केली. 

कडेकोट पोलीस बंदोबस्त 

सीमाबांधव निदर्शने करण्याकरीता कोल्हापूरला येणार असल्याची कुणकुण पोलिसांना सोमवारी सायंकाळी लागली होती. आंदोलक किती संख्येने आहेत याचा मात्र त्यांना अंदाज येत नव्हता. त्यामुळे मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घराभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला होता.

पालकमंत्र्यांच्या घराकडे जाणारे सर्वच रस्ते अडविण्यात आले होते. चौकशी केल्याशिवाय कोणाला आत सोडले जात नव्हते. राज्य राखीव दलाच्या तुकडीसह सशस्त्र पोलीस बंदोबस्त होता. अश्रूधुराच्या नळकांड्याही पोलिसांनी आणल्या होत्या. स्वत: पोलीस अधीक्षकांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही यावेळी उपस्थित होते. 

पाणी व अल्पोपहाराची सोय

आंदोलक येणार म्हटल्यावर त्याच्या पिण्याच्या पाण्याची तसेच अल्पोपहाराची सोय पोलिसांतर्फे करण्यात आली होती. तशी सूचना व पूर्वकल्पना पोलीस अधीक्षक मोहिते यांनी आंदोलकांना दिली होती; परंतु पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन अलंकार हॉल येथे नेल्यामुळे हा ‘सरकारी पाहुणचार’ घेण्याची संधी आंदोलकांना मिळाली नाही. 

Web Title: Will not run, will not run, Kolhapur demonstrations of Maharashtra Integration Committee, 35 activists in custody,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.