वैचारिक दहशतवाद खपवून घेणार नाही : संजीव पुनाळेकर

By admin | Published: September 24, 2015 01:03 AM2015-09-24T01:03:24+5:302015-09-24T01:03:24+5:30

समीरच्या बाजूने ३२ वकिलांची फौज

Will not tolerate ideological terrorism: Sanjeev Punalekar | वैचारिक दहशतवाद खपवून घेणार नाही : संजीव पुनाळेकर

वैचारिक दहशतवाद खपवून घेणार नाही : संजीव पुनाळेकर

Next

कोल्हापूर : गोविंदराव पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी यांच्याप्रमाणेच काही समाजसेवक आणि प्रसारमाध्यमांनी वैचारिक दहशतवाद मांडला. त्यातच समीरसारख्या ‘सनातन’च्या निर्दोष साधकाला बळीचा बकरा बनविण्याचे काम पोलिसांनी केले आहे. एखाद्या निर्दोषाला कायदेशीर मदत म्हणून वकील मिळणे आवश्यक होते. मात्र, कोणताही वकील पुढे न आल्याने आम्ही सर्व एकाच विचारधारेचे वकील असल्याने ३२ जणांची फौज घेऊन आल्याचे संशयित समीर गायकवाडचे वकील संजीव पुनाळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते कसबा बावडा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पानसरे हत्याप्रकरणी संशयितांची बाजू मांडण्यासाठी बुधवारी आले होते. पुनाळेकर म्हणाले, समीर हा ‘सनातन’शी संबंधित आहे, म्हणून त्याला पोलिसांनी बळीचा बकरा बनविले आहे. समीर हा ‘सनातन’चे काम करतो म्हणजे त्यानेच हे कृत्य केले आहे, असे होत नाही. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी समीर कोल्हापुरात नव्हे तर ठाण्यात होता, हे पोलिसांच्या तपासातच पुढे आले आहे. मग तो येथे नव्हताच तर त्याला या प्रकरणात पोलीस का गोवत आहेत, असा सवालही त्यांनी बोलताना केला. एखाद्याची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी कोणीच पुढे येत नसेल तर त्याला आम्ही बाहेरून कायदेशीर मदत देऊ शकतो. तसेच समीर हा निष्पाप असून त्याला मदत करण्यासाठी मडगाव, कऱ्हाड, बेळगाव, पुणे, सांगली, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, मिरज, अकोला, आदी ठिकाणांहून ३२ वकिलांची फौज आणली. या वकिलांच्या पथकासाठी कोणत्याही प्रकारचे कॅम्पेनिंग केलेले नाही. आमच्याकडे वकीलपत्र असूनही पोलीस समीरला भेटू देत नाहीत. कायद्याने पोलीस कोठडीत असताना त्याला आठवड्यातून किमान दोन वेळेला भेटता येते; तर न्यायालयीन कोठडीत असताना रोज भेटता येते. मग कोल्हापूरचे पोलीस त्याला भेटू देत नव्हते. आम्ही केवळ त्याला १० मिनिटे भेटू शकलो आहोत. पोलिसांनी तो ‘सनातन’चा साधक असल्याने सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी दिली आहे. समीरच्या पाठीशी आमचे ३२ जणांचे पथक राहणार असून संपूर्ण लढा त्याच्या बाजूने देणार आहोत.

समीरच्या बाजूने ३२ वकिलांची फौज
एखाद्या खटल्यासाठी प्रथमच ३२ वकिलांची फौज संशयित आरोपीच्या बाजूने उभी केली होती. त्यामुळे या सुनावणीसाठी सरकारी वकील चंद्रकांत बुधले व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एस. चैतन्या यांनी संशयितांविरोधात बाजू मांडली, तर संशयितांच्या बाजूने अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी बाजू मांडली. त्यांना साहाय्य करण्यासाठी सांगली जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष एम. एम. सुहासे, वीरेंद्र इचलकरंजीकर, बाळासाहेब देशपांडे, नीलेश सांगावकर, संदीप आयशिंगेकर, सुरेश कुलकर्णी, अ‍ॅड. देवदास शिंदे यांच्यासह ३२ वकील उपस्थित होते. समीरचे वकीलपत्र न्यायमूर्तींसमोर ठेवले. त्यावेळी त्याच्या बाजूने इचलकरंजीकर यांच्यासह मुंबई, अहमदनगर, सांगली, पुणे, औरंगाबाद, मिरज, अकोला, बेळगाव (कर्नाटक), गोवा येथील ३१ वकिलांच्या सह्या होत्या.

Web Title: Will not tolerate ideological terrorism: Sanjeev Punalekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.