Kolhapur News: सहा हजार भरून करार..म्हणे २५ लाख देणार, दोन हजार जणांकडून सव्वा कोटी उकळले

By विश्वास पाटील | Published: December 29, 2022 06:42 PM2022-12-29T18:42:57+5:302022-12-29T18:43:30+5:30

एका व्यक्तीच्या नावे मुदतबंद ठेवीची पावती केली आहे व ती पावती दाखवून अशीच रक्कम सर्वांना दिली जाणार असल्याचे आमिष दाखविण्यात येत आहे

Will pay Rs 6000 to contract and pay Rs 25 lakh, A new fraud fund in Kolhapur | Kolhapur News: सहा हजार भरून करार..म्हणे २५ लाख देणार, दोन हजार जणांकडून सव्वा कोटी उकळले

Kolhapur News: सहा हजार भरून करार..म्हणे २५ लाख देणार, दोन हजार जणांकडून सव्वा कोटी उकळले

Next

विश्वास पाटील

कोल्हापूर : सहा हजार रुपये भरून करार करणार आणि थोडेथोडके नव्हे तर तब्बल २५ लाख रुपये देणार, असे सांगून एका ट्रस्टने कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी व शेजारच्या कर्नाटकातील लोकांकडूनही तब्बल १ कोटी २० लाख रुपये उकळले आहेत. त्यासाठी एका व्यक्तीच्या नावे मुदतबंद ठेवीची पावती केली आहे व ती पावती दाखवून अशीच रक्कम सर्वांना दिली जाणार असल्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. लोकांनाही त्याची भूरळ पडली आहे. पण सहा हजार भरल्यानंतर २५ लाख देणारी जगात अशी कोणती बँक आहे, याचा शोध कोणच सूज्ञ माणूस घ्यायला तयार नसल्याचे चित्र आहे.

आपल्याला पैसे मिळणार या लालसेपोटी गोरगरीब हातावरील पोट असलेल्या लोकांनी उसनवार करून ६ हजार रुपये जमवून या ट्रस्टकडे दिले आहेत. त्यांना मिळणारा लाखातला फायदा फारच दूर, करार करताना दिलेले ६ हजार रुपयेही परत मिळण्याची शक्यता धूसर आहे. या ट्रस्टचे कार्यालय बिनखांबी गणेश मंदिराजवळ होते. ‘लोकमत’मध्ये बातम्या आल्यानंतर ते बंद झाले. परंतु तोपर्यंत सुमारे २ हजार लोकांनी या ट्रस्टकडे नोंदणी केल्याची माहिती स्वत: या ट्रस्टनेच दिली आहे. २ हजार लोक व प्रत्येकी ६ हजार हाच हिशोब केल्यास सव्वा कोटीपर्यंत ही रक्कम जाते. 

किमान २५ हजार लोकांची नोंदणी करण्याचे या ट्रस्टचे उद्दिष्ट आहे. या ट्रस्टचे कोल्हापूर आणि पुण्यात कार्यालय आहे. आमच्याकडे प्रचंड निधी आहे. त्याच्या गुंतवणुकीतून मिळणारा नफा, पंतप्रधान रिलिफ फंडातून समाज कार्यासाठी उपलब्ध झालेला नाही. सर्व धर्मीय जनतेच्या हितासाठी गिफ्ट डीड ॲक्टिव्हिटी उपक्रमातून वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

परंतु ते साफ खोटे आहे. कारण कोणत्याच धर्मादाय किंवा सार्वजनिक ट्रस्टला कायद्याने असे व्यक्तिगत करार करून पैसे वाटण्याचा अधिकार नाही. पंतप्रधान निधीही असे थेट पैसे वाटत नाही. लोकांना विश्वास वाटावा व जास्तीत जास्त लोकांनी ६ हजार प्रमाणे गुंतवणूक करावी, यासाठी हा फंडा वापरला जात असल्याचे दिसते. ३१ मार्च २०२३ पर्यंत असे करार केले जाणार असून, त्यानंतर करार केलेल्या व्यक्तीस बँक खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सहा हजारचे काय..?

करार करून घेतलेल्या ६ हजारपैकी संबंधित ट्रस्टला ५ हजार रुपयेच जाणार आहेत. त्यापैकी ३९०० रुपये थेट ट्रस्टच्या प्रमुख असलेल्या महिलेच्या नावावर जमा होणार आहेत. उर्वरित ११०० रुपये स्टॅम्प पेपर, नोटरीसाठी वकिलांचे शुल्क व स्टेशनरीसाठी घेतले जातात असे सांगण्यात आले. वाढीव एक हजार हे कुणाची वर्गणी कमी पडली तर त्याच्या भरपाईसाठी वापरले जातात म्हणे..म्हणजे हपापाचा माल गपापाला, असा सगळा कारभार आहे.

असा फंडा..

या ट्रस्टने कोल्हापुरातील जवाहरनगरमधील एका कर्मचाऱ्याच्या नावे १८ महिने मुदतीने एका औद्योगिक बँकेत २५ लाख मुदतबंद ठेव ठेवली आहे. त्याची मुदत १८ एप्रिल २०२३ला संपणार आहे. ही ठेव पावती प्रत्येकाला दाखवून तुम्हालाही अशीच ठेव पावती व मुदतीनंतर रक्कम मिळणार असल्याचे आमिष दाखवले जाते. कोणही सामान्य माणूस अशी पावती पाहून करार करण्यास तयार होईल. ट्रस्टचा कावा तसाच आहे.

Web Title: Will pay Rs 6000 to contract and pay Rs 25 lakh, A new fraud fund in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.