माणसे मेल्यावर जाग येणार का?
By admin | Published: August 5, 2016 01:13 AM2016-08-05T01:13:38+5:302016-08-05T02:00:08+5:30
शिवसेनेने विचारला जाब : दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
कोल्हापूर : तांत्रिक बाबी न तपासता व सर्व परवानग्या घेण्यापूर्वीच पर्यायी शिवाजी पुलाचे काम सुरू केल्याने ते रखडले आहे. माणसे मेल्यावरच तुम्ही जागे होणार काय? यातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करा, अशा प्रश्नांची सरबत्ती करीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे यांना गुरुवारी धारेवर धरले.
शिवाजी पुलाबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम कार्यालय येथे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे व अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे यांची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती करीत निवेदन दिले.
‘शिवाजी पुलासंदर्भात तुम्ही काय केले सांगा; अन्यथा तुमच्या कार्यालयाला टाळे ठोकू. निव्वळ पुढाऱ्यासारखे बोलू नका,’ अशा शब्दांत आर. के. बामणे यांना संजय पवार यांनी ठणकावले. निव्वळ टक्केवारी आणि कुणी किती खायचे अशी स्पर्धाच येथे सुरू आहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी संजय पवार यांनी केली.
विजय देवणे यांनीही बामणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवीत, ‘शिवाजी पुलाची मुदत संपली आहे, याची अधिसूचना तुम्ही त्या ठिकाणी का लावली नाही? अशा शब्दांत समाचार घेतला. पर्यायी शिवाजी पुलाच्या कामासंदर्भात चौकशी समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावर बामणे यांनी आमच्या विभागाने आवश्यक त्या परवानग्या घेण्यापूर्वीच पर्यायी पुलाचे काम सुरू केल्याचे सांगितले.
यावेळी शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, शशी बिडकर, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, रणजित आयरेकर, रवींद्र पाटील, अभिजित बुकशेठ, आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)
अधीक्षक अभियंता मंगळवारी कोल्हापुरात
प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता बामणे यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या वरिष्ठांना तुम्ही कोल्हापुरात बोलावून घ्या, असे संजय पवार यांनी साळुंखे यांना सांगितले. त्यावर बामणे यांनी प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता नेहूडकर यांना फोन लावून तो साळुंखे यांच्याकडे दिला. यावेळी साळुंखे यांनी पवार यांच्याशी त्यांचे बोलणे करून दिले. त्यानुसार मंगळवारी (दि.९) कोल्हापुरात बैठक घेऊ, असे आश्वासन नेहूडकर यांनी पवार यांना दिले.
जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध
एका बाजूला अधीक्षक अभियंता साळुंखे ब्रिटिशकालीन सर्व पूल भक्कम असल्याचा दावा करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी अमित सैनी हे मच्छिंद्री झाल्यावर पंचगंगेवरील शिवाजी पूल बंद करणार, असे म्हणत आहेत, यातील कुणाचे बरोबर म्हणायचे, असा सवाल करत पवार व देवणे यांनी ‘शिवाजी पूल मच्छिंदी झाल्यावरच बंद करू’, असे म्हणणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला.