दूध भुकटी करण्यासाठी अनुदान देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:43+5:302021-06-04T04:19:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिल्लक दुधाची भुकटी करण्यासाठी संघांना अनुदान देण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. लवकरच सकारात्मक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिल्लक दुधाची भुकटी करण्यासाठी संघांना अनुदान देण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. लवकरच सकारात्मक परिणाम दिसतील, असे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खासगी दौऱ्यावर ते आले होते. मंत्री केदार म्हणाले, राज्यात लॉकडाऊनमुळे मागील वर्षीप्रमाणेच दूध विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे शिल्लक दुधाचा प्रश्न पुन्हा भेडसावू लागला आहे. त्यामुळे भुकटी करण्याचा पर्याय आहे; पण त्याला बाजारात दर नसल्याने त्याला शासनाने अनुदान द्यावे, असा संघाचा आग्रह आहे. गेल्यावर्षीदेखील शासनाने १२७ कोटींचे अनुदान दिले होते. यावर्षीदेखील हाच पर्याय निवडला जाणार आहे.
राज्यात रोज सरासरी ५० लाख लिटर तर, पश्चिम महाराष्ट्रात ४ लाख लिटरहून अधिक दूध शिल्लक राहते. गोकूळ दूध संघाकडे लॉकडाऊनमुळे सरासरी एक लाख ७० हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. शिल्लक दुधामुळे दूध संघांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने सहकारी आणि खासगी दूध संघांकडे अतिरिक्त दूध पाठवावे. प्रक्रिया करणाऱ्या दूध संघांना प्रतिकिलो ३० रुपये तर, दूध पाठविणाऱ्या संघांना वाहतूक खर्चापोटी लिटरमागे तीन रुपये द्यावेत. सरासरी २५ रुपये लिटर याप्रमाणे गायीचे दूध खरेदी करण्याची मागणी होत आहे. यावर तोडगा काढणार असल्याची माहिती मंत्री केदार यांनी दिली.