स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : फडवणीस यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 07:17 PM2021-06-18T19:17:22+5:302021-06-18T19:20:01+5:30
कागल : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थी हे नियुक्ती अभावी अडचणीत आले आहेत. या विद्यार्थ्यांना ...
कागल : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थी हे नियुक्ती अभावी अडचणीत आले आहेत. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिली.
राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह समरजित घाटगे यांनी मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या. एमपीएससीमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्रे तातडीने द्या, असे न्यायालयीन आदेश असतानासुद्धा राज्य शासनाने या नियुक्त्या केलेल्या नाहीत. सुमारे २१८५ विद्यार्थी हक्काच्या नोकरीपासून वंचित आहेत. परीक्षा उत्तीर्ण होवून सुद्धा दोन- दोन वर्षापासून हे विद्यार्थी न्यायासाठी झगडत आहेत. शैक्षणिक प्रवेश, सवलतीमध्ये आम्हाला न्याय द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी यावेळी केली.
#MPSC सह इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या शासनाने समस्यांचा डोंगर ऊभा केला आहे. अशावेळी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असा शब्द विरोधी पक्षनेते मा. @Dev_Fadnavis जी यांनी आज दिला. मुंबई येथे विद्यार्थी शिष्टमंडळासह मी त्यांची भेट घेतली. pic.twitter.com/jBi4Ni0ytM
— Raje Samarjeetsinh Ghatge (@ghatge_raje) June 18, 2021
विद्यार्थ्यांच्या मागण्या विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सविस्तर समजून घेतल्या. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण निश्चितपणे विधानसभेत आवाज उठवू अशी ग्वाही त्यांनी दिली. सुपर न्युमररीचा पर्याय वापरून शासनाने या सर्व विद्यार्थ्यांना सामावून घ्यायला हवे, असे सांगत यासाठी मी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करेन असेही त्यांनी सांगितले.