केएमटीमध्ये धावणार पण... फक्त २२ प्रवाशांनाच घेऊनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:06 AM2020-06-01T11:06:23+5:302020-06-01T11:08:18+5:30
कोल्हापूर : केएमटी बस तब्बल सव्वादोन महिन्यांनंतर आज, सोमवारपासून धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू राहणार आहे. प्रारंभी आठ ...
कोल्हापूर : केएमटी बस तब्बल सव्वादोन महिन्यांनंतर आज, सोमवारपासून धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू राहणार आहे. प्रारंभी आठ बसमार्गांवर सेवा देण्यात येणार आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील लहान मुलांना तात्पुरता प्रवेश बंद केला आहे. पहिल्या टप्प्यात १० बस सेवेत असणार आहेत, अशी माहिती परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये के.एम.टी.ची बससेवा २४ मार्चपासून बंद करण्यात आली होती. सर्वपक्षीय कृती समिती, प्रवासी यांनी बससेवा सुरू करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आज, सोमवारपासून बससेवेला सशर्त परवानगी दिली आहे. याचबरोबर चालक, वाहकांना कामावर असताना हँडग्लोव्हज व मास्क बंधनकारक केले आहेत. तिकीट देण्यापूर्वी वाहकाकडून प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर देण्यात येईल. किमान प्रवासी उपलब्ध झाल्यास बस सोडण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील बससेवेचे मार्ग
शाहू मैदान ते मार्केट यार्ड, शाहू मैदान ते विवेकानंद कॉलेजमार्गे शुगर मिल, गंगावेश ते एस.टी. स्टँड, छत्रपती शिवाजी चौक ते कळंबा, छत्रपती शिवाजी चौक ते क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, छत्रपती शिवाजी चौक ते बोंद्रेनगर, छत्रपती शिवाजी चौक ते जरगनगरमार्गे आर.के.नगर, गणपती मंदिर व छत्रपती शिवाजी चौक ते राजारामपुरीमार्गे आर.के.नगर गणपती मंदिर
२२ प्रवाशांना प्रवेश
सर्व बसेसचे प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक बसमधून कमाल २२ प्रवाशांनाच प्रवास करता येईल. प्रवाशांना बसमध्ये मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.
सातनंतर बस राहणार बंद
आठ मार्गांवर एकूण १० बसेसद्वारे सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानंतर बससेवा बंद असणार आहे.