शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 01:05 PM2019-11-04T13:05:45+5:302019-11-04T13:24:06+5:30
नुकसानग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या असून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अटी, शर्ती बाजूला ठेवून शेतकरी, बागायतदार, मच्छिमार यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे. असे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले.
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत आम्ही सर्वच राजकीय नेते एकत्र येऊन विविध ठिकाणी पाहणी करीत आहोत. या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या असून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अटी, शर्ती बाजूला ठेवून शेतकरी, बागायतदार, मच्छिमार यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे. असे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले.
कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी आणि 'क्यार' वादळ यामुळे शेतकरी आणि मच्छिमारांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी रविवारी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांसह केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कणकवली तालुक्यातील खारेपाटण, तळेरे, नांदगाव याठिकाणी आदित्य ठाकरे यांनी शेती नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी खासदार विनायक राऊत , पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सिंधुदुुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर , जिल्हाप्रमुख संजय पडते, सुशांत नाईक, शैलेश भोगले, हर्षद गावडे , गीतेश कडू आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.