जिल्ह्यातून एकच उमेदवार देण्यासाठी पुढाकार घेणार : सतेज पाटील यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:19 AM2020-02-03T10:19:03+5:302020-02-03T10:20:37+5:30
कोल्हापूरचा आमदार करायचा, अशी एकवाक्यता हवी. आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकले पाहिजे आणि तुम्ही त्याच्याशी बांधील राहिला पाहिजेत, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.
कोल्हापूर : शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून इच्छुक जास्त असले तरी सर्वांना विश्वासात घेऊन एकच उमेदवार निश्चित केला जाईल. यावेळी कोणत्याही परिस्थतीत शिक्षक व पदवीधर आमदार हा कोल्हापूरचाच झाला पाहिजे, यासाठी एकसंध राहूया, असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक तोंडावर आली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत मुश्रीफसाहेब आपणास याबाबत बसावे लागणार आहे. कोल्हापुरातून इच्छुक भरपूर आहेत. आपापसांत चर्चा करून कोणाही एकाचे नाव निश्चित करा.
जिल्ह्यात पदवीधर आणि शिक्षक दोन आमदार झाले तर जिल्ह्याच्या दृष्टीने हे भूषणावह आहेच; मात्र विकासाला चालनाही मिळेल. सर्व गटांमध्ये समन्वयासाठी प्रयत्न करूया. कोल्हापूरचा आमदार करायचा, अशी एकवाक्यता हवी. आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकले पाहिजे आणि तुम्ही त्याच्याशी बांधील राहिला पाहिजेत, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.
‘कोजिमाशि’ पाहिजे तर आमदारकी नाही
आपल्या भांडणात आजपर्यंत कोल्हापूरला शिक्षक मतदारसंघातून संधी मिळालेली नाही. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील संस्था वाटून घ्या, ज्याला ‘कोजिमाशि’ पाहिजे आहे, त्यांनी आमदारकीकडे यायचे नाही, सगळे व्यवस्थित होईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.