तासगाव विधानसभा बिनविरोध होणार का?
By admin | Published: March 3, 2015 10:28 PM2015-03-03T22:28:49+5:302015-03-03T22:34:51+5:30
कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे एकमत : भाजपमध्ये मतभिन्नता, शिवसेना पक्षप्रमुखांच्या भरोसे
सांगली : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात त्यांच्या कुटुंबियांपैकी एकास उमेदवारी देऊन पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांचे सूर जुळले असले तरी, भाजपमध्ये याबाबत मतभिन्नता दिसून येते. दुसरीकडे शिवसैनिक मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर आता या रिक्त जागेवरील पोटनिवडणुकीचा मुद्दा चर्चेत आला आहे. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी या विषयाला वाचा फोडली आहे. आबांच्या पत्नीस उमेदवारी देऊन सर्व पक्षांनी ही जागा बिनविरोध करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनीही याच विषयावर मत व्यक्त करताना, निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी येथे काँग्रेसचा उमेदवार देणार नाही, असे सोमवारी जाहीर केले. माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी नेत्यांनीही ही जागा बिनविरोध व्हावी म्हणून अन्य पक्षांना आवाहन केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांचे तासगाव-कवठेमहांकाळबाबत एकमत दिसत असले तरी, भाजपमध्ये याबाबत मतभिन्नता दिसून आली. बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने बिनविरोधची भूमिका घेतली होती. याची आठवण करून देताना, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी तासगाव-कवठेमहांकाळबाबत बिनविरोधच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनी मात्र निवडणूक लढविण्याची भूमिका स्पष्ट केली. आर. आर. पाटील यांच्याविरोधात गतवेळी निवडणूक लढविणारे भाजपचे अजितराव घोरपडे यांनीही, पक्ष जी भूमिका घेईल त्याचे आम्ही पालन करू, असे सांगितले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अंजनी येथेच पक्ष याठिकाणी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सांगलीचे खासदार व आबांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय पाटील यांनी आताच याविषयीची चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगून लोकभावना आणि पक्षीय निर्णयाप्रमाणे भूमिका राहील, असे सांगितले आहे. (प्रतिनिधी)
आबांच्या पत्नीसाठी आग्रह
कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या काही नेत्यांनी आबांच्या पत्नी सुमनतार्इंना उमेदवारी मिळावी, अशी भूमिका मांडली. दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे तसेच आबांना खऱ्याअर्थाने आदरांजली वाहायची असेल तर, त्यांच्या पत्नीस उमेदवारी मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आबांची ज्येष्ठ कन्या स्मिता पाटील सध्या २४ वर्षाच्या आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी त्यांचे वय कमी पडते. त्यामुळेच आता आबांच्या पत्नी सुमनतार्इंचाच पर्याय सर्वांना योग्य वाटत आहे. त्यांच्या कुटुंबियांमध्ये याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तरीही राजकीय पातळीवर त्यांच्या नावाबाबत एकमत होताना दिसत आहे.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच याविषयीची भूमिका स्पष्ट करतील. व्यक्तिगत भूमिका व्यक्त करण्यापेक्षा पक्षप्रमुखांच्या निर्णयाची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. योग्यवेळी याबाबतचा निर्णय होईल.
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री, नेते, शिवसेना
इतक्या घाईने मी कोणतीही भूमिका जाहीर करणार नाही. लोकभावना आणि पक्षीय विचार याचा विचार करून पक्षच याविषयीचा निर्णय घेऊ शकतो. माझ्या व्यक्तिगत मताला अर्थ नाही. त्यामुळे पक्षीय निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करू.
- अजितराव घोरपडे, माजी मंत्री, भाजप