Kolhapur News: अंबाबाईची मूर्ती बदलणार की संवर्धन?, देवस्थान, पुजाऱ्यांची नकारघंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:09 PM2023-02-28T12:09:41+5:302023-02-28T12:10:03+5:30

अंबाबाईच्या मूर्तीची झीज हा विषय गेल्या कित्येक वर्षांपासूनचा प्रलंबित आहे

Will the idol of Ambabai in Kolhapur be changed or conserved | Kolhapur News: अंबाबाईची मूर्ती बदलणार की संवर्धन?, देवस्थान, पुजाऱ्यांची नकारघंटा

Kolhapur News: अंबाबाईची मूर्ती बदलणार की संवर्धन?, देवस्थान, पुजाऱ्यांची नकारघंटा

googlenewsNext

कोल्हापूर : पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीलाच अंबाबाईची मूर्ती बदलण्याची इच्छा नसल्याने गेली वर्षानुवर्षे देवीच्या मूळ मूर्तीची प्रतारणा सुरू आहे. दर दोन पाच वर्षांनी मूर्तीचे संवर्धन होते. पुढच्यावेळी ती आणखीनच खराब होते, पुन्हा तात्पुरतचे कोटिंग करून मूर्ती बदलण्याचा विषय पुढे ढकलला जाताे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर मूर्ती बदलणे हाच एकमेव पर्याय आहे. दरम्यान आज, मंगळवारी पुरातत्त्वचे सहसंचालक विलास वहाने हे मूर्तीची पाहणी करणार आहेत.

अंबाबाईच्या मूर्तीची झीज हा विषय गेल्या कित्येक वर्षांपासूनचा प्रलंबित आहे. मूळ मूर्तीत कोल्हापूरकरांच्या भावना गुंतल्या आहेत, मूर्ती बदलाचा निर्णय घेतला तर विरोध होईल या भीतीने आजवर या प्रश्नावर उघडपणे कोणी चर्चा केली नाही. हे खरेच आहे की देवतांच्या मूर्तीवर भाविकांची श्रद्धा असते, म्हणूनच मूर्ती दगडी असली तरी त्यापुढे नतमस्तक होतात. पण मूर्तीच धोक्यात आली असेल, तिची आणखी प्रतारणा होताना पाहणे हे एक भाविक म्हणून जास्त वेदनादायी आहे.

म्हणे आई कशी बदलणार?

या विषयावर एका पुजाऱ्याने मूर्ती बदलावर आई कशी बदलणार असा युक्तिवाद मांडला; पण तिची रोज प्रतारणा होत राहणे आणि ते बघणे जास्त वेदनादायी आहे. अंबाबाईची मूर्ती यापूर्वी एकदा बदलली आहे. सध्याची मूर्ती पाहवत नाही अशा स्थितीत आहे. मूर्तीला चिरा, भेगा, खड्डे पडले आहेत, पण तशी मूर्तीची स्थिती चांगली आहे असा विचित्र निष्कर्ष पुरातत्त्व खात्याने दिला होता.

दुर्घटनेची वाट बघताय का?

आतापर्यंत फक्त मूर्तीचा चेहरा सुस्थितीत होता; पण मागीलवर्षी मूर्तीचे नाक, ओठ, हनुवटी, कान ते गाल हा भागदेखील दुखावल्याने ऐन नवरात्राच्या तोेंडावर धोका नको म्हणून एका रात्रीत संवर्धन केले गेले. हाच प्रकार २०१५ पासून वारंवार केला जातो. सगळं आलबेल असेल तर लपवाछपवी का केली जात आहे.. की देवस्थान आणि पुजारी दुर्घटनेची वाट बघत आहेत.

शंकराचार्यांची समिती नेमा.. कोल्हापूरकरांना विश्वासात घ्या

मूर्तीत भक्तांच्या भावना गुंतल्या असल्या तरी निर्णय घ्यावाच लागणार आहे, ती कधी ना कधी बदलावी लागणार आहे, ते अंतिम सत्य आहे. त्यासाठी देवस्थान समिती व पुजाऱ्यांनी एकत्र येऊन शंकराचार्यांची समिती नेमावी. कोल्हापूरकरांचीदेखील आता तशी मानसिकता झाली आहे. त्यामुळे आता देवस्थानने पुढाकार घेऊन मूर्ती बदलासाठी पावले उचलावीत.


मूर्तीची झीज अशी

  • १९२० साली एका पुजाऱ्याच्या हातून तांब्या निसटल्याने देवीचा हात दुखावला.
  • १९५५ साली वज्रलेप झाला. मात्र, तो चुकीच्या पद्धतीने केल्याने मूर्तीचे मूळ सौंदर्य नष्ट झाले.
  • १९९७ साली मूर्तीवरील स्नान, अभिषेक थांबवले
  • २०१५ साली मूर्तीवर रासायनिक संवर्धन केले गेले, त्यात मूर्तीच्या मस्तकावरील नाग, हातातील पानपात्र गायब केले.

Web Title: Will the idol of Ambabai in Kolhapur be changed or conserved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.