शिरढोणमध्ये पारंपरिक विरोधक एकत्र येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:04+5:302020-12-17T04:47:04+5:30

गणपती कोळी कुरुंदवाड : ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने शिरढोण (ता. शिरोळ) येथे राजकीय वातावरण तापू लागले आहे. गावात पक्षीयपेक्षा ...

Will traditional opponents come together in Shirdhon? | शिरढोणमध्ये पारंपरिक विरोधक एकत्र येणार?

शिरढोणमध्ये पारंपरिक विरोधक एकत्र येणार?

Next

गणपती कोळी

कुरुंदवाड : ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने शिरढोण (ता. शिरोळ) येथे राजकीय वातावरण तापू लागले आहे. गावात पक्षीयपेक्षा स्थानिक गटाचेच राजकारण असते. मात्र, पारंपरिक लढत होणारे बाणदार विरुद्ध खंजिरे गट यंदाच्या निवडणुकीत गळ्यात गळा घालण्याच्या विचारात असल्याने राजकीय वर्तृळात आश्चर्य व्यक्त होत आहे, तर निवडणुकीत तरुणाई अधिक रस दाखवत असल्याने चुरस वाढण्याची शक्यता आहे.

गतनिवडणुकीत सर्वच गटांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात बहुतांश यशही आले होते. निवडले गेलेले सदस्य व त्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी गटनेत्यांची सुकाणू समिती स्थापन केली होती. मात्र, निवडणुकीनंतर सुकाणू समितीने कारभाराकडे दुर्लक्ष केल्याने सदस्यांमध्ये कधी पदावरून, तर कधी टक्केवारीवरून गेल्या पाच वर्षांत अंतर्गत वाद चांगलाच गाजला. वाद आणि श्रेयवादात गेल्या पाच वर्षांत आधीच्या कार्यकाळात मंजूर असलेली नळ पाणीपुरवठा वगळता कोणतेही भरीव काम झालेले नाही. सांडपाणी, अंतर्गत रस्ते, गटारी, आदी गंभीर प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांत नाराजी आहे.

निवडणुकीचा बिगुल वाजल्याने अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. प्रत्येक निवडणुकीतील खंजिरे विरुद्ध बाणदार गट अशी निवडणूक होत असे. मात्र, खंजिरे गटनेते अविनाश खंजिरे शरीर स्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्याने व त्यांच्या बहुतेक समर्थकांची बाणदार गटाशी जवळीक असल्याने एकत्र येऊन निवडणूक लढविण्याबाबत बैठका होत आहेत. त्यामुळे विरोधक कोण, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. इच्छुकांमध्ये तरुणांची संख्या जास्त असून, गेल्या काही दिवसांपासून तयारीलाही लागले आहेत. त्यामुळे गावात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे.

* शिरढोण एकूण मतदान - ६७५०

* एकूण प्रभाग - सहा

चौकट -

गावातील प्रमुख गट

गावात प्रामुख्याने दस्तगीर बाणदार (बाणदार गट), अविनाश खंजिरे (यड्रावकर गट), कल्लाप्पा टाकवडे (सा. रे. पाटील गट), चंद्रकांत मोरे (माने गट) व स्वाभिमानी संघटना असे प्रमुख पाच गट आहेत. प्रत्येक निवडणुकीत खंजिरे विरुद्ध बाणदार अशीच लढत होत असून, इतर गट सोयीनुसार युती करत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Will traditional opponents come together in Shirdhon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.