पंचगंगा घाटाचे काम होण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:14+5:302021-04-08T04:23:14+5:30
कोल्हापूर : येथील पंचगंगा नदी घाट विकासाचे काम होण्यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती प्रयत्न करणार असून, ...
कोल्हापूर : येथील पंचगंगा नदी घाट विकासाचे काम होण्यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती प्रयत्न करणार असून, याबाबत लवकरच खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन प्रलंबित असलेल्या मंजुरीसाठी त्यांना विनंती करणार आहे, असे कृती समितीतर्फे रमेश मोरे व अशोक पोवार यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर शाखेतर्फे नदी घाट विकासाच्या कामासाठी दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाकडे फेरप्रस्ताव पाठविला आहे. याआधी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर यांना सोबत घेऊन केंद्रीय पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे; परंतु त्याचा पाठपुरावा कमी पडत असल्याचे लक्षात आले आहे. म्हणूनच कृती समितीचे सर्व सदस्य संभाजीराजे यांना भेटणार आहेत.
सन २०१८ मध्ये हेरिटेज कमिटीत कोणकोण सदस्य व अध्यक्ष होते. त्यावेळी ही समिती अस्तित्वात होती की नाही, कमिटीच्या बैठकीत कोणी तक्रार केली याची माहिती घेण्यात येणार असून, तक्रारदार समजल्यानंतर त्यांच्याशी एकत्रितपणे बसून चर्चा घडवून आणण्यातही कृती समिती पुढाकार घेणार आहे, असे मोरे व पोवार यांनी सांगितले.