मणिपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 01:44 PM2023-07-28T13:44:45+5:302023-07-28T13:47:16+5:30

मणिपूर येथे शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन परिस्थिती पाहणी करुन राष्ट्रपती यांनाही निवेदन देणार

Will visit Manipur and inspect the situation says Raju Shetty | मणिपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार : राजू शेट्टी

मणिपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार : राजू शेट्टी

googlenewsNext

इचलकरंजी : मणिपूरला शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट देऊन परिस्थितीची स्वत: पाहणी करणार आहे. राष्ट्रपतींनाही मणिपूर घटनेसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शहरात सुरू केलेले ‘७२ तास आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन’ची सांगता गुरुवारी केली. वीर पत्नींच्या हस्ते त्यांना सरबत देण्यात आले.

मणिपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि येथील माता-भगिनींच्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी आपण देशवासीय असमर्थ ठरलो याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी ७२ तास अन्नत्याग केला होता. सुमनदेवी प्रकाश चव्हाण (शिरोळ), सुलभाताई रावसाहेब पाटील (टाकवडे), उज्ज्वला जोतिराम चौगुले (अतिग्रे) व सुनीता विजय मोरे (सांगली) या वीर पत्नींच्या हस्ते नारळ पाणी घेऊन त्यांनी आंदोलनाची सांगता केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शेट्टी म्हणाले, एका निर्भया प्रकरणामुळे देशामध्ये सत्तांतरण घडले होते. याचा इतिहास राज्यकर्त्यांना नजरेआड करता येणार नाही. चंद्र-तारे असेपर्यंत कोणाला सत्ता करायची आहे, त्यांनी सत्ता करावी. मात्र, या देशातील महिला, निराधार, मुले यांच्या संरक्षणाची जबाबदारीही उचलावी. अशा घटना घडतील असतील, तर नागरिक गप्प बसणार नाहीत. आम्ही प्राणपणाने या घटनांचा विरोध करू.

मी स्वत: मणिपूर येथे शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन परिस्थिती पाहणार आहे. राष्ट्रपती यांनाही निवेदन देणार आहे. यावेळी जालिंदर पाटील, जनार्दन पाटील, जयकुमार कोले, विकास चौगुले, हेमंत वणकुंद्रे, बसगोंडा बिराजदार, सतीश मगदूम, अण्णासाहेब शहापुरे, अविनाश कोरे, सचिन शिंदे, प्रसाद कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, निवृत्ती शिरगुरे आदी उपस्थित होते.

Web Title: Will visit Manipur and inspect the situation says Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.