दिवाळीसाठी तरी घरी जायला मिळणार का ? वृध्द, बालकांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:26 AM2017-10-18T11:26:32+5:302017-10-18T11:35:46+5:30
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर सुरु केलेल्या संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात जाणाºया प्रवाशांना सक्तीने घर असून सणादिवशी कोल्हापूरच्या बसस्थानकावरच मुक्काम करण्याची वेळ आली.
कोल्हापूर, दि. १८ : महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर सुरु केलेल्या संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांना घर असून सणादिवशी कोल्हापूरच्या बसस्थानकावरच सक्तीने मुक्काम करण्याची वेळ आली.
दिवाळीच्या दिवशी तरी घरी जायला मिळणार का, असा सवाल प्रवाशांमधील महिला, वृध्द आणि बालके करीत आहेत. बुधवारी पहाटेपर्र्यत संप मिटेल या आशेने बसस्थानकातच मुक्काम करणाऱ्या प्रवाशांना कोणतेही वाहन मिळाले नाही. खाण्यापाण्यावाचून त्यांची आबाळ होत होती.
घरी जाण्यासाठी येताना सोबत आणलेली ओझी वागवत केविलवाण्या प्रवाशांची ही अवस्था पाहवत नव्हती. ऐन दिवाळीत कोल्हापूर जिल्ह्यातील बाराही आगारांत बसगाड्या थांबून राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. खासगी वाहनधारकांनी या संधीचा फायदा घेत प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू केली.
मंगळवारी मध्यरात्री तर कर्मचाऱ्याच्या संपाचा मोठा त्रास प्रवाशी सहन करत होते. मध्यरात्री दोन वाजल्यानंतरही बसस्थानकावरची प्रवाशांची गर्दी ओसरलेली नव्हती. बसस्थानक परिसर एसटी नसल्याने ओकाबोका होता. प्रवाशी मात्र कोणते वाहन मिळेल का याची आतुरतेने वाट पहात होते.
अनेकांनी तर बसस्थानकातच झोपणे पसंत केले. नेहमी चोकशीसाठी गजबजलेले केबिनही असे ओसाड पडले होते. दुसºया बाजूला प्रवाशांना संरक्षण देणारी आणि मदत करणारी पोलिसांची यंत्रणाही सिध्द नव्हती. या कक्षात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाची खुर्चीही रिकमीच होती.
सारेच हात झटकून मोकळे होत होते. यामुळे सर्वच प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यामध्ये वृध्द, महिला, गरोदर महिला, बालके यांचीही सुटका नव्हती. हे सारे प्रवाशी केविलवाण्या अवस्थेत निराशेने बसस्थानक परिसरात बसले होते. घर असूनही घरी जाण्यासाठी काही मिळेल या आशेने हे प्रवाशी इतस्तत: भटकत होते.
कोल्हापूर बसस्थानकाबाहेरही अनेक प्रवाशी आपल्या कुटूंबासह आपापल्या बॅगा, पिशव्या घेउन महिला, लहान मुलांसह घरी जाण्यासाठी वाहन शोधत असल्याचे चित्र दिसत होते. पुणे-मुबईवरून आलेले प्रवाशी ग्रामीण भागात जाण्यासाठी कोणतीच सोय नसल्यामुळे वैतागले होते. काही ठिकाणी प्रवाशी आणि खासगी वाहतूक करणाऱ्या मध्ये दरावरुन वादावादी सुरू होती.
काही ठिकाणी खासगी वाहतूकदार जादा पैसे घेऊन वडाप करण्यात मग्न होते. यावेळी एकही पोलीस किेवा प्रशासनाचा एकही अधिकारी वा कर्मचारी प्रवाशांच्या मदतीला आले नाहीत. यामुळे बुधवारची नरकचतुर्दशीची पहाट प्रवाशांना एसटीच्या कर्मचाऱ्याच्या संपामुळे बसस्थानकावरच घालवावी लागली.
एस.टी. बंदचा सर्वांत जास्त फायदा खासगी वाहतूकदारांनी उचलला. ऐन दिवाळीत बसस्थानकात अडकलेल्या प्रवाशांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी अनेकांनी दुप्पट-तिप्पट दर लावून प्रवाशांची लूटमार सुरू केली होती. दराबाबत तर मनमानीचाच कारभार या ठिकाणी पाहावयास मिळत होता.
नाइलाजास्तव इतके चढे दर देऊन अनेकांनी प्रवास केला. बस आता सुरू होईल, मग सुरू होईल, या विचारात असलेल्या व सुमारे पाच ते सात तास ताटकळत बसलेल्या प्रवाशांना पाण्याची बाटली घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे पाणीविक्रेत्यांचीही या निमित्ताने दिवाळीच साजरी झाली.