पैशासाठी रस्तेही भाड्याने देणार का?
By admin | Published: August 21, 2016 12:12 AM2016-08-21T00:12:43+5:302016-08-21T00:21:15+5:30
सुनील कदम यांचा जाब : महापालिका सभेत गदारोळ; हळू आवाजात बोला, महापौरांनी खडसावले
कोल्हापूर : अयोध्या पार्क येथील सार्वजनिक पार्किंगसाठी असलेल्या जागेचे कुंपण आजच्या आज तोडून ही जागा सार्वजनिक पार्किंगकरिता खुली करावी; तसेच चुकीच्या पद्धतीने ही जागा दिल्याप्रकरणी संबंधित अधिकारी संजय भोसले यांना निलंबित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी सुनील कदम यांनी शनिवारी झालेल्या महानगरपालिकेच्या विशेष सभेत केली. पैसे मिळतात म्हणून आज डी. पी. रस्त्याची जागा दिलीत, उद्या काहीही भाड्याने देणार का? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, केएमटीसंदर्भातील चर्चा सुरू असताना वारंवार ‘पॉइंट आॅफ आॅर्डर’च्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढणाऱ्या सुनील कदम यांना ‘मी अध्यक्ष आहे. आवाज खाली करून बोलायचे’ अशा शब्दांत महापौर अश्विनी रामाणे यांनी फटकारल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.
केएमटी कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड आणि ‘एलआयसी’चे पैसे भरण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी केएमटीला देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी ही विशेष सभा बोलाविण्यात आली होती. प्रस्ताव मंजूर करूया; परंतु त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे, अशी विनंती विरोधी पक्षनेता संभाजी जाधव यांनी केली. त्यानुसार सभागृहात चर्चा सुरू झाली.
सुनील कदम व जयंत पाटील यांनी केएमटीला दररोज किती नुकसान होतंय, गाड्या नवीन आहेत, डिझेलच्या किमती उतरल्या आहेत, तरीही नुकसानीत वाढ का झाली? शिवाय नुकसान कमी करण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या? असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर प्रभारी वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले उत्तर देत असताना कदम यांनी वारंवार ‘पॉइंट आॅफ आॅडर’ देत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महापौर रामाणे यांनी कदम यांना ‘तुम्ही आधी त्यांचे ऐकून घ्या, मग बोला’ असे सांगितले. त्यावर कदम यांनी आम्ही माहिती विचारू शकतो. तो आमचा अधिकार आहे, असे मोठ्या आवाजात प्रत्युत्तर देताच महापौर संतप्त झाल्या. ‘मी अध्यक्ष आहे. तुम्ही हळू आवाजात बोला. आधी अधिकारी सांगतात ते ऐकून घ्या. ऐकायचे नसेल तर बाहेर व्हा,’ अशा शब्दांत महापौरांनी कदम यांना सुनावले. भाजप-ताराराणी आघाडीचे सर्व सदस्य जागेवर उभे राहून महापौरांच्या वक्तव्याला हरकत घेऊ लागले. त्यातच कमलाकर भोपळे महापौरांच्या आसनाकडे जाऊन ‘आम्ही जनतेचे सेवक आहोत. सभागृहात बोलण्याचा आम्हालाही अधिकार आहे’, असे सांगू लागले. भोपळे पुढे गेल्याने सत्तारूढ कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्यसुद्धा जागेवर उभे राहिले आणि गोंधळ करायला लागले. सुनील कदम ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांना ‘आवाज खाली करून बोला,’ असे म्हणू नका, अशी विनंती अजित ठाणेकर यांनी महापौरांना केली. ‘चर्चा करा, सविस्तर करा; पण शांतपणे करावी,’ असे सांगून महापौरांनी सभागृहातील गोंधळ शांत केला. यावेळी भूपाल शेटे,जयंत पाटील, विजय सूर्यवंशी, शेखर कुसाळे, आशिष ढवळे, प्रवीण केसरकर, लाला भोसले, आदींनी भाग घेतला.
भोसले यांना निलंबित करा
उत्पन्नवाढीसाठी केएमटीची अयोध्या पार्क येथील जागा भाड्याने दिल्याची माहिती संजय भोसले यांनी देताच सुनील कदम यांनी त्यालाही हरकत घेतली. ही जागा कशी काय भाड्याने दिली? या जागेतून डीपी रस्ता जातो. मग तो भाड्याने देता येतो का? अशी विचारणा कदम यांनी केली.
सध्या ही पार्किंगची जागा बंदिस्त असल्याने निदर्शनास आणून देत आजच्या आज हे पार्किंग सार्वजनिक करावे, तेथील कंपौंड भिंती तोडाव्यात, तसेच चुकीच्या पद्धतीने ही जागा भाड्याने देणाऱ्या संजय भोसले यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी नियाज खान, राहुल चव्हाण यांनीसुद्धा लावून धरली.
२९ बसेसना जबाबदार कोण?
केंद्र सरकारने ‘जेएनएनयूआरएम’ योजनेतून १०४ बसेस मंजूर केल्या होत्या. त्यांतील ७५ बसेस घेण्यात आल्या; परंतु २९ बसेस खरेदी करण्यास विलंब झाला. त्यामुळे त्या परत गेल्या. त्यामुळे के एमटीचे नुकसान झाले. याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजी जाधव यांनी केली. जाधव यांनी या प्रश्नावर संजय भोसले यांना चांगलेच फैलावर घेतले.
चार कोटींचा प्रस्ताव मंजूर
के एमटी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह
निधी आणि एलआयसी हप्त्यांची रक्कम भरण्यासाठी चार कोटी रुपये महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातून के एमटीला देण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला.