जयसिंगपूरच्या समस्यांवर ‘नेम’ साधणार ?
By admin | Published: March 4, 2015 09:24 PM2015-03-04T21:24:19+5:302015-03-04T23:43:15+5:30
आमदारांनी घेतली बैठक : विविध पक्ष, संघटनांनी मांडल्या समस्या; शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या
जयसिंगपूर : शहरातील विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्यासमोर अनेक मूलभूत प्रश्न आणि समस्या मांडल्या. प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका आ. पाटील यांनी घेतल्यामुळे जयसिंगपूरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सत्ताधारी विरुद्ध नाराजगट या बैठकीत एकत्र आल्याने ‘एका दगडात दोन पक्षी मारण्याचा नेम’ आ. पाटील कसा साधतात हे येणाऱ्या काळात समजणार आहे.पालिकेच्या दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात आ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. शहरातील मूलभूत प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राजकीय पक्ष, तरुण मंडळे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक व शहरवासीय असे बैठकीचे स्वरूप होते. शहरात उड्डाण पूल व्हावा, मोकाट जणावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, उपनगरातील रस्ते, गटारी, दिवाबत्ती, पाणी, अन्न सुरक्षा योजना, वाहतूक कोंडी, शिरोळ रस्त्याचे पालिकेकडे हस्तांतरण, ज्येष्ठांसाठी विरगुंळा केंद्र, क्रीडांगण, लक्ष्मीपार्कमधील समस्या, तंबाखूवरील वाढविण्यात आलेला व्हॅट यामुळे कामगारांच्या रोजगाराचा उभा राहिलेला प्रश्न, प्राथमिक आरोग्य केंद्रातून अत्याधुनिक सेवा मिळाव्यात यांसह अनेक मूलभूत प्रश्न आणि समस्या बैठकीत मांडण्यात आल्या. आ. पाटील यांनी प्रश्नाबाबतची गाऱ्हाणी ऐकून सकारात्मक भूमिका व्यक्त केली. प्रसंगी रस्त्यावर उतरू असाही इशारा त्यांनी दिला आहे. ‘आमदार आपल्या दारी’ या भूमिकेतून आ. पाटील यांनी जयसिंगपूर शहरापासून सुरुवात केली आहे. याचे जनतेतून स्वागत होत असले तरी शहरासाठी ते निधी कितपत खेचून आणतात, यावरच बरेच काही अवलंबून आहे. सत्ताधारी विरुद्ध नाराजगट या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले, अशीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आगामी काळात पालिकेची निवडणूकही होणार असल्यामुळे बैठकीच्या निमित्ताने आ. पाटील एका दगडात दोन पक्षी मारण्यात कसे यशस्वी होतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
(प्रतिनिधी)
शहरवासीयांच्या अपेक्षा
उड्डाणपूल, मोकाट जणावरांचा बंदोबस्त, रस्ते, गटारी, दिवाबत्ती, पाणी, अन्न सुरक्षा योजना, वाहतूक कोंडी, ज्येष्ठांसाठी विरगुंळा केंद्र, क्रीडांगण, तंबाखूवरील व्हॅट.
सत्ताधाऱ्यांकडे लक्ष
आमदार उल्हास पाटील यांनी आयोजित केलेल्या विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीस सत्ताधारी गटाचे नगरसेवक अनुपस्थितीत होते. त्यामुळे आ. पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत सत्ताधारी विकासकामांतून उत्तर देणार की पत्रकबाजीतून, याकडे लक्ष लागून राहिले आहे.