दुर्घटना झाल्यानंतरच लक्ष देणार का ?

By admin | Published: January 6, 2015 11:34 PM2015-01-06T23:34:18+5:302015-01-07T00:05:37+5:30

अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न : सुरक्षा वाढविण्याची 'एटीएस'ची सूचना; जबाबदारी कोणाची ?

Will you pay attention only after the accident? | दुर्घटना झाल्यानंतरच लक्ष देणार का ?

दुर्घटना झाल्यानंतरच लक्ष देणार का ?

Next

कोल्हापूर : भारतात घडत असलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जावी, अशी सूचना गेल्या पाच वर्षांत किमान दहावेळा तरी झाली आहे; पण ही जबाबदारी पोलीस, जिल्हा प्रशासन, देवस्थान समिती आणि महापालिका अशा शासकीय यंत्रणांमध्ये
विभागली गेल्याने ही जबाबदारी सगळ्यांचीच; पण कुणालाच त्याची फिकीर नाही. त्यामुळे या सूचनेची गेल्या पाच वर्षांत अंमलबजावणी झालेली नाही. दुर्घटना झाल्यानंतरच लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी (एटीएस)ने काल, रविवारी अंबाबाई मंदिराची व परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी व मंदिराची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी सूचना केली. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही अनेकवेळा केंद्र व राज्य पातळीवरच्या सुरक्षा संस्थांनी व ‘एटीएस’ने अंबाबाई मंदिराची पाहणी करून सुरक्षा वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्यावर फारशी अंमलबजावणी झालेली नाही. मंदिराच्या अंतर्बाह्य परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यात आले. सुरक्षा कर्मचारी, पोलीस नेमले, तरी मंदिराची सुरक्षा यथातथाच आहे.
अंबाबाई मंदिर सध्या जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका आणि देवस्थान समिती या चार विभागांत वाटले गेले आहे. एखादा निर्णय घ्यायचा किंवा त्यावर कार्यवाही करायची म्हटली की, प्रत्येक विभाग दुसऱ्याकडे बोट दाखवितो. काहीवेळा अडचणी सांगितल्या जातात. या सगळ्यांत निर्णय प्रलंबितच राहतात.
खरे तर अंबाबाई मंदिराची सर्वस्वी जबाबदारी देवस्थान समितीचीच. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने समितीने सुसज्ज राहणे अपेक्षित आहे. सुरक्षेसाठी सशस्त्रधारी पोलीस तैनात करणे ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची; पण त्यांना लागणारी सर्व यंत्रणा अगदी सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर, एक्स-रे स्कॅनर... ही उपकरणे पुरविण्याची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची. मंदिराबाहेरचा परिसर महापालिकेच्या अखत्यारीत येतो. येथील अतिक्रमण हटविण्यापासून ते फेरीवाल्यांच्या स्थलांतराचे अधिकार महापालिकेच्या हातात आहेत. मात्र, देवस्थान समिती आणि महापालिकेलाच सुरक्षेचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. काही घटना घडली, नवरात्र असले की चार दिवस सुरक्षेचा बाऊ केला जातो. नंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती पाहायला मिळते. (प्रतिनिधी)

ढीगभर यंत्रणा; तरीही असुरक्षित
मंदिराच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने चारही दरवाजांवर दोन महिला, दोन पुरुष अशा चार म्हणजे एकूण १६ पोलिसांची नेमणूक केली आहे; तर गाभाऱ्यात चौघेजण असतात. देवस्थान समितीने रक्षक ग्रुपच्या ३३ सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. तसेच लष्कराचे १७ कर्मचारी आहेत. शिवाय होमगार्ड आहेत. अशा रीतीने मंदिराच्या सुरक्षेसाठी जवळपास शंभरजणांची नेमणूक करण्यात आली आहे. नवरात्रात ही संख्या दुप्पट असते. याशिवाय गाभारा व बाह्य परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हॅँड मेटल डिटेक्टर, डोअर मेटल डिटेक्टर आहेतच. मात्र, सुरक्षेच्या या दोन्ही यंत्रणा अनेकदा तर बंदच असतात. तरीही एवढी ढीगभर सुरक्षा यंत्रणा असूनही कुणाचा कुणाला ताळमेळ नाही.

Web Title: Will you pay attention only after the accident?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.