वाऱ्याच्या गतीने धावणारा-सतीश देसाई

By admin | Published: February 8, 2017 12:05 AM2017-02-08T00:05:43+5:302017-02-08T00:05:43+5:30

सतीशचा खरा फुटबॉल शहाजी छत्रपती कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर बहरला.

Wind speed-Satish Desai | वाऱ्याच्या गतीने धावणारा-सतीश देसाई

वाऱ्याच्या गतीने धावणारा-सतीश देसाई

Next

सतीश देसाई यास शिवाजी संघाची साथ सोडून महाकाली तालीम संघात प्रवेश मिळाला. या संघाकडून खेळताना पहिल्याच सामन्यात सतीशने शिवाजी तरुण मंडळावर दोन गोल करून महाकाली तालीम मंडळास विजयी केले. सतीशने ही आठवण आपल्या हृदयात कोरून ठेवली आहे.सतीश रामराव देसाई याचा जन्म वाशी नाका परिसरात झाला. सवंगड्यांसह खेळताना लहानपणीच सतीशला फुटबॉलची गोडी लागली. उन्हाळ्यात रंकाळ्यातील पाणी कमी झाल्यानंतर उघड्या हिरवळीवर मोठ्या ईर्षेने लहान मुलांच्या खेळात रंग भरत असे. त्याचा फुटबॉल खेळ या बाल चमूतून उदयास आला. ४ फूट ११ इंच उंचीच्या मापाच्या स्पर्धामध्ये सतीश डाव्या बगलेवर खेळू लागला. यावेळी तो म्युनिसिपल शाळा नं. ८ मध्ये होता. या स्पर्धा या शाळेच्या क्रीडांगणावर होत असत. सतीशला हास्कूलच्या जीवनात फुटबॉल खेळास फारसा वाव मिळाला नाही.
सतीशचा खरा फुटबॉल शहाजी छत्रपती कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर बहरला. शहाजी कॉलेजमध्ये क्रीडासंचालक कै. एस. पी. लाड यांच्या प्रेरणेमुळे व वणिरे सर, अकबर मकानदार यांच्या मार्गदर्शनामुळे शहाजी कॉलेजच्या फुटबॉल संघात पहिल्याच वर्षी त्याची ‘लेफ्ट आऊट’ या जागेवर निवड झाली. सतीशच्या काळात शहाजी, न्यू, गोखले व कॉमर्स या चार कॉलेजांमध्ये नेहमीच चुरस असे. शहाजी कॉलेजकडून सतीश तीन वर्षे खेळला. प्रत्येक वर्षी शिवाजी विद्यापीठ झोन, इंटर झोन स्पर्धेत सतीश ‘लेफ्ट आऊट’च्या टाळ्या घेऊन गेला. गरजेप्रमाणे तो आपल्या संघातून ‘लेफ्ट इन’लाही खेळला. डाव्या बगलेतून मुसंडी मारून वाऱ्याच्या गतीने प्रतिस्पर्धी संघावर स्कोअर केले आहेत. अखिल भारतीय पश्चिम विभागीय विद्यापीठ स्पर्धेत सतीशची शिवाजी विद्यापीठ संघात सलग तीन वेळा निवड होऊन त्याने अनुक्रमे गोवा, इंदूर आणि कोल्हापूर येथे ‘लेफ्ट आऊट’मधून चमकदार कामगिरी केली.
सतीश देसाई आता ‘लेफ्ट आऊट’ या जागेवर परिपक्व झाला. बेताची उंची, निमगोरा रंग, दणकट शरीरयष्टी, मितभाषी, खेळातील तांत्रिक बाजू भक्कम. त्याच्या खेळात गती होती. फर्स्ट टाईम पास देणार. डाव्या बगलेतून लो- ड्राईव्ह किंंवा साईड व्हॉली किकच्या सहायाने गतिमान स्कोअर करण्याची स्टाईल वाखाणण्यासारखी होती. अनेक सामन्यांत त्याने असे गोल केले आहेत.
त्याच्या खेळाने त्याला स्थानिक सीनिअर संघात मागणी वाढू लागली. त्याकाळात नावाजलेल्या संघात स्थान मिळणेही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. त्यावेळी खेळाडूला आताप्रमाणे पैसा मिळत नव्हता. पदरमोड करून बऱ्याचवेळा स्पोर्टकिट्ची जमवाजमव करून खेळाडू खेळत असत. दरम्यान, सतीशला स्थानिक शिवाजी तरुण मंडळ या संघाकडून ‘लेफ्ट आऊट’ या जागेवर खेळण्याची संधी मिळाली.
कोल्हापुरात पावसाळ्यानंतर अनेक संयोजक मंडळांच्या स्थानिक स्पर्धा होत. या सर्व प्रकारच्या स्पर्धा सतीश खेळला. शिवाय याच संघातून मिरज, सांगली, गडहिंंग्लज, बेळगाव, दारव्हा, पुणे, इत्यादी बाहेरगावच्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी लाभली. सतीश फार काळ शिवाजी संघाकडून खेळला नाही. त्याला पेठेतीलच महाकाली तालीम फुटबॉल संघात स्थान मिळाले. या संघाकडून खेळतानाही त्याने अनेक स्पर्धांमध्ये आपल्या कोल्हापुरी खेळाचे पाणी दाखविले. महाकाली तालीम संघाकडून खेळताना पहिल्याच सामन्यात सतीशने शिवाजी तरुण मंडळावर दोन गोल करून महाकाली तालीम मंडळास विजयी केले. सतीशने ही आठवण आपल्या हृदयात कोरून ठेवली आहे. सतीश देसाई याने ‘कॉमर्स’ विषय घेऊन पदवी परीक्षा पूर्ण केली. नोकरीच्या मागे न लागता आपल्या भावाच्या सहायाने गेली अनेक वर्षे किराणा मालाचा उत्तम व्यापार करीत आहे. स्वभावाने अत्यंत मवाळ. सामना चालू असताना शांतपणे खेळणारा, अजातशत्रू, मितभाषी. फुटबॉलमधील सर्व अनिष्ट प्रथांपासून दूर राहणारा. सामना रेफ्रींचा आदर बाळगणारा. खिलाडूवृत्ती जपणारा. संयमपूर्वक बोलणारा. आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत एकदाही कोणतेच कार्ड घेतले नाही. यातून त्याच्या स्वभावाचे गमक लक्षात येईल. (उद्याच्या अंकात : शौकत महालकरी)


प्रा. डॉ. अभिजित वणिरे

Web Title: Wind speed-Satish Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.