विंडो शॉपिंग

By Admin | Published: February 13, 2017 12:36 AM2017-02-13T00:36:22+5:302017-02-13T00:36:22+5:30

विंडो शॉपिंग

Window shopping | विंडो शॉपिंग

विंडो शॉपिंग

googlenewsNext


गांधीजी म्हणाले होते, ‘जगाची लोकसंख्या कितीही कमी वाढली तरी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यात निसर्ग कधी कमी पडणार नाही; पण माणसाची लालसा, हाव तो भागवू शकणार नाही’, याचा प्रत्यय आपण घेतो आहोतच. गरज असो वा नसो, बाजारात आलेली प्रत्येक नवी वस्तू घेतलीच पाहिजे, असा जणू अलिखित नियमच ‘आहे रे’ वर्गानं केला आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांतल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, सहाव्या वेतन आयोगाने दिलेलं पाठबळ या वर्गाच्या मागे आहे. अनिवार्थ जागतिकीकरण, खुला व्यापार, सौंदर्य स्पर्धांचे निकाल, टी.व्ही. चॅनेलवरच्या जाहिरातींचा मारा यांतून परदेशी धान्य, फळे, भाज्या, साबण अशा आणखीही असंख्य वस्तू, ज्यांच्यावाचून आपलं काहीही अडत नव्हतं, त्या अत्यावश्यक होऊन बसल्या आहेत. बेसिनवरच्या साध्या साबणाच्या वडीची जागा आता हँडवॉशने घेतली आहे. नवीन गरजा निर्माण करणे हा उत्पादक कंपन्यांचा विक्रीफंडा झाला आहे.
त्यामुळे अतोनात वस्तूंच ‘शॉपिंग’ करणं हा एक छंद झाला आहे. घरं वस्तूंनी खचाखच भरली आहेत, पण त्यासाठी निसर्गाची किती हानी आपण करतो आहोत याचे कुणाला भान नाही. सगळीकडे नुसता चंगळवाद बोकाळला आहे. साधी राहणी कमीपणाची वाटायला लागली आहे. मॉलमध्ये खरेदी हा ‘स्टेटस सिम्बॉल’ झाला आहे.
ही सगळी प्रगत अशा अमेरिका-युरोपातल्या उत्पादक देशांची चाल आहे. विकसनशील, अविकसित देशांना बळीचा बकरा बनविण्याची! अठराव्या शतकातही आपल्या वस्तू विकण्यासाठी बाजारपेठा शोधत ते आशियात, आफ्रिकेत आले आणि इथले मालकच होऊन बसले. आता विसाव्या शतकात तर त्यांनी आणखी नामी युक्ती लढविली आहे. राज्यकारभाराची कटकट न करता नफा कमविण्याची. त्या युक्तीचे आपण बळी ठरलो आहोत.
नुकत्याच झालेल्या नोटाबंदीच्या परिणामांविषयीचे अर्थतज्ज्ञांचे, सरकारचे अंदाज तितकेसे बरोबर ठरले नाहीत, हे कटू असलं तरी वास्तव आहे. भ्रष्टाचारानं इथंही शिरकाव केलाच आहे. त्यामुळे काळा पैसा ‘सिर्फ कागजके टुकडे’ होतील हा अंदाज एकीकडं, बनावट नोटा, जुन्या-नव्या चलनाचा साठा, किलोच्या पटीतलं सोनं सापडणं हे दुसरीकडे, बँकांसमोर लागलेल्या सामान्यांच्या लांबलचक रांगा हे तिसरीकडं, शेतकरी-कामगारांची झालेली गोची, कमी झालेली व्यापारी उलाढाल चौथीकडं असे अडचणींचं चित्र असताना आणखी एक आशादायक चित्रचौकट समोर आली आहे.
उच्च आर्थिक वर्गाला केवळ छंद किंवा वेळ घालविण्याचं साधन म्हणून लागलेली ‘शॉपिंग’ची चटक आता आवरती घ्यावी लागली आहे. आता ‘सावध होऊन पुढच्या हाका’ ऐकणं त्यांना भाग पडलं आहे. हातात असलेल्या सुट्या नोटा आता संपवून चालणार नाही. कारण आॅनलाईन व्यवहार, कार्डांचा वापर सगळीकडेच करता येणार नाही. मॉलमध्ये गेलं तरी ‘विंडो शॉपिंग’वरच समाधान मानावं लागणार. मैत्रिणींनी, नातेवाइकांनी पाहिलेल्याच साड्या आणि शर्ट तूर्तास तरी पुन्हा पुन्हा वापरावे लागणार. ‘काटकसर, बचत’ हे शब्द आपल्या कोशात आणावे लागणार आहेत. ‘मिनिमलिझम’ म्हणजे कमीत कमी वस्तूंचा वापर ही संकल्पना आता जगभरात पसरू लागली आहे. आपल्या घरातल्या वस्तूंचे पसारे, अडगळ आवरली तर आपलं मनही स्वच्छ होत जातं. ताणतणाव कमी होतात. अनावश्यक शारीरिक श्रम करावे लागत नाहीत. त्यामुळं तुम्ही मुक्तपणे जगू शकता. तुमच्या भावनांनाही मोकळं आकाश मिळतं. ते वस्तूंच्या विचारात अडकून राहत नाही हा विचार आता बऱ्याच जणांना पटायला आणि अनुभवायलाही मिळतो आहे. नोटाबंदीनं तो आपल्यात रुजविला तर हेही एक ‘स्वच्छता अभियान’च ठरेल नाही का?
- वैशाली गोखले

Web Title: Window shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.