गडहिंग्लज तालुक्यात बदलाचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:43+5:302021-01-19T04:26:43+5:30

गडहिंग्लज : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून गडहिंग्लज तालुक्यात बदलाचे वारे दिसून आले. एकूण ८९ पैकी ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. ...

Winds of change in Gadhinglaj taluka | गडहिंग्लज तालुक्यात बदलाचे वारे

गडहिंग्लज तालुक्यात बदलाचे वारे

Next

गडहिंग्लज : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून गडहिंग्लज तालुक्यात बदलाचे वारे दिसून आले. एकूण ८९ पैकी ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यापैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ४४ पैकी २१ गावांत सत्तांतर झाले. १५ ग्रामपंचायतींची सत्ता मिळवून राष्ट्रवादीने आपला वरचष्मा कायम राखला. भाजपाला ३, शिवसेनेला ३, तर जनता दलाला २ ग्रामपंचायतींची सत्ता मिळाली. उर्वरित ग्रामपंचायतींवर संमिश्र आघाडी सत्तेवर आली आहे. नूलमध्ये जनता दल व राष्ट्रवादीने विरोधी सर्वपक्षीय आघाडीचा पराभव करून सत्ता अबाधित राखली. मुत्नाळमध्ये राकेश पाटील, राजगोंडा पाटील व मार्तंड जरळी यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्तांतर घडविले.

मासेवाडीत ३० वर्षांनंतर दशरथ कुपेकर गटाची सत्ता संपुष्टात आली. वाघराळीमध्ये बी. एम. पाटील यांनी सत्तांतर घडविले. ऐनापुरात किसनराव कुराडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता अबाधित राखली. दुंडगे येथे तालुका संघाचे माजी अध्यक्ष तम्माण्णा पाटील गटाची २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. याठिकाणी अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. संजय देसाई व उदयकुमार देसाई यांची आघाडी सत्तेवर आली. हलकर्णी येथे वीरशैव बँकेचे संचालक सदानंद हत्तरकी यांनी १३ पैकी ११ जागा मिळवून सत्ता अबाधित राखली. माद्याळ येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते महाबळेश्वर चौगुले यांच्या आघाडीचा युवक राष्ट्रवादीच्या आघाडीने पराभव केला.

हनिमनाळ, औरनाळ व हसूरचंपू येथे भाजपाने आपली सत्ता अबाधित राखली. तेरणी व हुनगिनहाळमध्ये जनता दलाने बहुमत मिळविले. लिंगनूर क।। नूल व शेंद्रीत राष्ट्रवादीकडून विरोधी सर्वपक्षीय आघाडीने सत्ता हस्तगत केली. नरेवाडीत राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते अंकुश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्तांतर घडविले. बेळगुंदीत मिलिंद मगदूम, तर हिरलगे येथे सचिनकुमार देसाई यांनी सत्ता कायम राखली. इंचनाळमध्ये सर्वपक्षीय आघाडीने राष्ट्रवादीकडून सत्ता हस्तगत केली. चन्नेकुप्पीत अमर चव्हाण यांनी सत्ता अबाधित राखली. उंबरवाडीत प्रकाश पताडे गटाने अप्पी पाटील गटाकडून सत्ता हस्तगत केली.

--------------------------------------

* सत्तांतर झालेली गावे - लिंगनूर क।। नूल, जरळी, शेंद्री, उंबरवाडी, मांगनूर तर्फ सावतवाडी, वडरगे, हेब्बाळ-जलद्याळ, हुनगिनहाळ, माद्याळ, दुंडगे, मासेवाडी, इंचनाळ, तेरणी, नंदनवाड, मनवाड, नरेवाडी, खणदाळ, वाघराळी, मुत्नाळ, नौकुड, लिंगनूर तर्फ नेसरी. --------------------------------------

* सत्ता अबाधित राहिलेली गावे - चन्नेकुप्पी, हनिमनाळ, नूल, मुंगूरवाडी, बुगडीकट्टी, शिप्पूर तर्फ आजरा, ऐनापूर, बेळगुंदी, औरनाळ, हेब्बाळ क।। नूल, हलकर्णी, जांभुळवाडी, हिरलगे.

--------------------------------------

* निवडणूक बिनविरोध झालेली गावे - इदरगुच्ची, चंदनकुड, तेगिनहाळ, गिजवणे, दुगूनवाडी, सावतवाडी तर्फ नेसरी. --------------------------------------

* निकालाची वैशिष्ट्ये

लिंगनूर तर्फ नेसरी येथील सुधाकर रेडेकर व ज्ञानदेव देसाई यांना समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला. त्यात रेडेकर हे भाग्यवान ठरले. चन्नेकुप्पीत राष्ट्रवादीने सत्ता अबाधित राखली. परंतु, विद्यमान सरपंच व सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष उदयसिंह चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला.

* हेब्बाळ कसबा नूल येथील राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच नागेश शिंगे यांचा केवळ एक मताने विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी ‘जद’चे काशिनाथ कणगली यांना २३४ मते मिळाली. कणगली निवडून आले असते तर सत्तांतर झाले असते.

Web Title: Winds of change in Gadhinglaj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.