मलकापुरात गारांसह वादळी पाऊस
By Admin | Published: March 2, 2016 01:22 AM2016-03-02T01:22:10+5:302016-03-02T01:25:43+5:30
लाखोंचे नुकसान : वालूर येथे झाड पडून कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक ठप्प
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात मंगळवारी विजेच्या कडकडाटांसह सुमारे तीन तासांपेक्षा अधिक काळ वादळी वारे व गारांसह अवकाळी पाऊस झाला. पावसाने ठिकठिकाणच्या घरांवरील पत्रे उडाली, तर काहींच्या शेतातील पिकांच्या नुकसानीबरोबरच आंब्याचा मोहरही गळून पडला. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे माड पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.
दुपारी ३. ३० वाजता सुरू झालेल्या या पावसाने तालुक्यातील ठिकठिकाणी सुमारे सात लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही गावांतील वीजपुरवठा व दूरध्वनी सेवा खंडित झाल्याने काही गावांचा संपर्कही तुटला होता. या अवकाळी पावसात कडवे येथील शेतकरी राजा कृषिसेवा केंद्राचे पत्रे उडून दोन लाख रुपयांचे, तर तालुक्यातील काही घरांचे पत्रे उडाले. बांबवडे, सरुड, कोतोली, शित्तूर वारुण, मलकापूर, आदी भागातील वीटभट्टया भिजल्यानेही मालकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. काही शेतकऱ्यांचेही गवत भिजल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे, तर कडवे येथीलराजाराम नानू आग्रे यांच्या शेतकरी राजा कृषी सेवा केंद्राचे पत्रे उडून गेल्यामुळे खताची पोती भिजून दोन लाखांचे नुकसान झाले.
इकबाल इब्राहिम बोबडे व भीमराव गायकवाड यांच्या, तर मलकापूर येथील साखरे गल्लीतील कुलकर्णी यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. आजरा बँकेसमोरील विद्युत खांब व विद्युतवाहिन्या सोसाट्याच्या वाऱ्याने पूर्णपणे धोकादायक स्थितीत वाकल्या होत्या. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील धोपेश्वर फाट्याजवळही झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
येथील वडगाव, रेठरे, मालेवाडी, पिरळे, जांभूर, खेडे, कडवेचा भागातील गुऱ्हाळघरांनाही याचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला मका, गहू, हरबरा, सूर्यफुल पिकांनाही पावसाचा तडाखा सोसावा लागल्याने शेतकरी हतबल झाल्याचे दिसत होते.
काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेले कलिंगड पीकही पूर्णपणे पावसामुळे उद्ध्वस्त झाले. दरम्यान, शाहूवाडी येथील आठवडा बाजारही विस्कळीत झाल्याने दिवसभर जमलेल्या छोट्या-मोठ्या व्यापारी वर्गालाही आजच्या कमाईवर पाणी सोडावे लागले.
तालुक्यातील वाळूर, निनाईपरळे, आंबा, कडवे, आदी गावांतील काही रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने जोड रस्ते व गावातील वाहतूक काही काळ ठप्प होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.
जोतिबा परिसरात पावसाचा शिडकावा
पोहाळे तर्फ आळते : कुशिरे, पोहाळे, गिरोली व जोतिबा परिसरात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पावसाने तुरळक हजेरी लावली. अर्धा तास चाललेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. दोन-तीन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. परिसरात दुपारपासून ढगाळ वातावरण होते.
कसबा बावड्यात पावसाची हुलकावणी
कसबा बावडा : कसबा बावड्याच्या काही भागात मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास अवघे पाच सहा मिनिटे पावसाचा शिडकाव झाला. नंतर मात्र पावसाने दडी मारली. दरम्यान, पावसाळी वातावरण बराच काळ राहिले होते.
विदर्भापासून आसामपर्यंत हवेच्या दाबाचे द्रोणीय क्षेत्र तयार झाल्याने राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. कसबा बावडा, आदी परिसरात गेले दोन दिवस पावसाचे वातावरण होते. पाऊस केव्हा पडेल, याचा अंदाज शेतकरी वर्ग बांधत होता. मंगळवारी मात्र पावसाचे वातावरण चांगलेच झाले होते. सायंकाळी सातच्या सुमारास हनुमान मंदिर, दत्त मंदिर, प्रिन्स शिवाजी शाळा, शुगर मिल, शिये टोलनाका, आदींसह काही भागात पाच ते सहा मिनिटे, परंतु अधूनमधून पावसाचा शिडकाव चालू होता.
अवकाळी पावसाने तारांबळ
४सरुड व परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि वीट व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात उष्णता होती.
४आकाशात ढगही जमा झाले होते. दुपारी चार वाजता अचानक आलेल्या पावसामुळे वीट व्यावसायिक, शेतकरी तसेच ऊस तोडणी कामगारांची चांगलीच तारांबळ उडाली. मंगळवारी सरुडचा आठवडा बाजार असल्याने व्यापाऱ्यांची व गिऱ्हाईक यांची चांगलीच धावपळ उडाली.