'Winner' ‘आशीर्वाद व्हिला’ रंगला गुलालात...- धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 07:32 PM2019-05-23T19:32:54+5:302019-05-23T19:45:58+5:30
धैर्यशील माने यांचे रुईकर कॉलनीतील ‘आशीर्वाद व्हिला’ हे निवासस्थान गुरुवारी गुलालात न्हाऊन निघाले. मतमोजणी सुरू झाल्यापासून धैर्यशील मानेंना मताधिक्य असल्याने सकाळपासूनच फटाक्यांची आतषबाजी, गुलाल, शिवसेनेचे भगवे झेंडे घेतलेले
कोल्हापूर : धैर्यशील माने यांचे रुईकर कॉलनीतील ‘आशीर्वाद व्हिला’ हे निवासस्थान गुरुवारी गुलालात न्हाऊन निघाले. मतमोजणी सुरू झाल्यापासून धैर्यशील मानेंना मताधिक्य असल्याने सकाळपासूनच फटाक्यांची आतषबाजी, गुलाल, शिवसेनेचे भगवे झेंडे घेतलेले कार्यकर्ते आणि ‘धैर्यशील मानेंचा विजय असो,’ ‘बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सकाळीच देवदर्शनासाठी गेलेले धैर्यशील सायंकाळी विजयी घोषित झाल्यानंतरच निवासस्थानी परतले.
हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात लढत होती. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीलाच धैर्यशील मानेंना मताधिक्य जाहीर झाल्याने सकाळी आठ वाजल्यापासून त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी सुरू झाली. माजी खासदार निवेदिता माने या कार्यालयात बसून मताधिक्याचे अपडेट जाणून घेत होत्या. बाहेर सत्त्वशील माने कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते.
येथे भाजप-शिवसेनेचे झेंडे आणि कार्यकर्त्यांना पाणी, सरबत अशी सरबराई सुरू होती. फेरीनिहाय मताधिक्याचे आकडे वाढत होते तसा कार्यकर्त्यांमधील उत्साहदेखील वाढत होता. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. कार्यकर्ते गळ्यात शिवसेनेचे तसेच भगवे झेंडे व शिवाजी महाराजांचे चित्र असलेले झेंडे घेऊन जल्लोष करीत होते.
धैर्यशील माने यांचे देवदर्शन
या सगळ्या जल्लोषासाठी स्वत: धैर्यशील व त्यांच्या पत्नी वेदांतिका मात्र उपस्थित नव्हत्या. मतांच्या आकडेवारीच्या घालमेलीत वेळ घालविण्याऐवजी देवदर्शनाचा निर्णय घेऊन ते सकाळीच सिद्धनाथ मंदिर, रुकडी, जोतिबा, नृसिंहवाडी, अंबाबाई मंदिर, प्रज्ञापुरी येथील स्वामी समर्थ मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर या देवस्थानांना गेले. इकडे घरी कार्यकर्ते त्यांची वाट पाहत होते. ते तासाभरात पोहोचतील, असा दिवसभर निरोप येत असला तरी सायंकाळी विजयी घोषित झाल्यानंतरच ते कोल्हापुरात परतले. त्यानंतर घरासमोर एकच जल्लोष झाला.
आजोबांंना अश्रू अनावर
आपल्या नातवाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी धैर्यशील यांचे आजी-आजोबा ‘आशीर्वाद व्हिला’मध्ये आले. आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना पाहताच निवेदिता यांनी त्यांना घट्ट मिठी मारली. यावेळी त्यांच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. निवेदिता माने यांनी आई-वडिलांना विजयाचा गुलाल लावून त्यांचे आशीर्वाद घेतले.
मगच गुलाल...
धैर्यशील माने यांना सुरुवातीपासून मताधिक्य असले तरी कार्यालयात बसलेल्या निवेदिता माने आणि सत्त्वशील माने यांची घालमेल सुरू होती. कार्यकर्ते गुलालात रंगले होते; पण हे मायलेक धैर्यशील यांच्या विजयश्रीवर शिक्कामोर्तब होणाऱ्या मताधिक्याची वाट पाहत होते. अखेर दुपारी बारानंतर धैर्यशील यांच्या मताधिक्याचे आकडे वाढत गेले आणि विजयाची खात्री पटल्यानंतरच दोघेही गुलालात न्हाऊन निघाले.