पीडितांचे अश्रू पुसा : नाईकडे
By admin | Published: December 26, 2014 09:45 PM2014-12-26T21:45:10+5:302014-12-26T23:59:49+5:30
जयसिंगपुरात शाहू व्याख्यानमालेस प्रारंभ : आज उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान
जयसिंगपूर : समाजसेवा हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक माणसात यश, कीर्ती, विद्या, बल या चार गोष्टींची आसक्ती असते. या चारही गोष्टी ज्येष्ठांच्या आशीर्वादाने प्राप्त होतात. समाजात जे दु:खी आणि पीडित आहेत, त्यांचे अश्रू पुसण्याची संधी मिळणे ही समाजसेवा आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी केले.
जयसिंगपूर नगरपालिकेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्यावतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ. सा. रे. पाटील होते. येथील छ. शाहू महाराज खुल्या नाट्यगृहामध्ये झालेल्या व्याख्यानप्रसंगी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, नगराध्यक्षा सुनीता खामकर, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर उपस्थित होते.
नाईकडे म्हणाले, पती, पत्नी आपण निवडू शकतो, पण आई कोणालाही निवडता येत नाही. मुलांना सुख, समृद्धी प्राप्त व्हावी हे आई-वडिलांचे स्वप्न असते. आई-वडिलांपेक्षा या जगात कोणतंही मोठे दैवत नाही. मुलं ज्येष्ठांचे अनुकरण करतात, त्यामुळे ज्येष्ठांनी समाजऋणाचे स्मरण ठेवले पाहिजे. सामाजिक व्याख्यानमाला नव्या पिढीला उत्तेजन देते. शुद्ध संकल्पनेची फळे उशिरा येत असली, तरी ती टिकून राहतात. इच्छाशक्ती प्रबळ झाल्याशिवाय निश्चित ध्येय गाठता येत नाही. त्यासाठी समाजसेवेबरोबर माणसामध्ये धार्मिक अधिष्ठानही असायला हवे. चिपरीचे माजी सरपंच बबन यादव यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, नागरिक उपस्थित होते. उद्या, शनिवारी सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान होणार आहे.