कोल्हापुरात वाहतूक पोलिसाच्या मदतीमुळे वाचले अत्यवस्थ कारचालकाचे प्राण

By उद्धव गोडसे | Published: August 10, 2023 03:33 PM2023-08-10T15:33:05+5:302023-08-10T15:33:41+5:30

देवदूतासारखे मदतीला धावून आलेल्या हवालदार कोळेकरांचे मुळीक कुटुंबीयांनी आभार मानले

With the help of the traffic police, the life of the car driver was saved In Kolhapur | कोल्हापुरात वाहतूक पोलिसाच्या मदतीमुळे वाचले अत्यवस्थ कारचालकाचे प्राण

कोल्हापुरात वाहतूक पोलिसाच्या मदतीमुळे वाचले अत्यवस्थ कारचालकाचे प्राण

googlenewsNext

कोल्हापूर : गांधीनगरहून परत येताना तावडे हॉटेल चौकात अचानक प्रकृती बिघडलेल्या कार चालकाला ड्यूटीवरील वाहतूक पोलिसाने तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे कारचालक विलास मुळीक (वय ५५, रा. क्रशर चौक, कोल्हापूर) यांचे प्राण वाचले. हा प्रकार बुधवारी (दि. ९) सायंकाळी घडला. समयसूचकता दाखवून हवालदार बाबासाहेब कोळेकर मदतीला धावल्याबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

बुधवारी सायंकाळी हवालदार कोळेकर तावडे हॉटेल चौकात कर्तव्यावर होते. सातच्या सुमारास गांधीनगरच्या दिशेने एक कार आली. कारची गती मंदावली आणि ती अचानक उजव्या बाजूला वळली. कारमधील महिलेचा आरडाओरडा ऐकून वाहतूक पोलिस कोळेकरांनी कारकडे धाव घेतली. काही अंतर पुढे जाऊन कार थांबली आणि कारचालक स्टेअरिंगवर डोके ठेवून निपचित पडले.

विचारपूस केल्यानंतर कारचालक विलास मुळीक यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मुळीक यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारमधील महिलेने हवालदार कोळेकरांनाच कार चालवत शास्त्रीनगरपर्यंत येण्याची विनंती केली.

त्यानुसार कोळेकर यांनी अत्यवस्थ मुळीक यांना रुग्णालयात दाखल केले. रक्तातील साखर वाढल्याने आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना त्रास सुरू होता. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांच्या जीविताचा धोका टळल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. कर्तव्यावर असताना देवदूतासारखे मदतीला धावून आलेल्या कोळेकरांचे मुळीक कुटुंबीयांनी आभार मानले.

Web Title: With the help of the traffic police, the life of the car driver was saved In Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.