मशागत, बियाणांनी शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे, यांत्रिकीकरणाबरोबर ‘संकरित वाण’ आलं मुळावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 01:10 PM2022-05-13T13:10:45+5:302022-05-13T13:11:18+5:30
सुरुवातीच्या टप्प्यात पेरणीसाठी शिवार झटपट तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाला शेतकऱ्यांनी कवटाळले. दिवसेंदिवस त्याची सवय शेतकऱ्यांना झाली आहे. मात्र, आता डिझेल दरवाढीने ट्रॅक्टरने मशागत करणे अडचणीचे ठरत आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : यांत्रिकीकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती अवजारे अडगळीत टाकली, पूर्वी घरोघरी असणारी ‘बीज बँक’ संकरितच्या नादाने काळाच्या ओघात बंद पडली. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम शेतीवर झाला आहे. यांत्रिकीकरण व संकरित बियाणे हे आता शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. मशागतीबरोबर बियाणांच्या दरात झालेल्या वाढीने जमीन कसायची कशी, पेरायचे काय, असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.
पूर्वी घरोघरी बैल, नांगर पाहावयास मिळत होते. साधारणत: एप्रिलपासूनच खरिपासाठी शिवार तयार करण्याची लगबग पाहावयास मिळत होती. मात्र, काळाच्या ओघात हे सगळे चित्र पालटून गेले आहे. बैलांच्या औताची जागा ट्रॅक्टर, रोटाव्हेटरने घेतली. त्यामुळे घरोघरी दिसणारा बैल, नांगर बंद झाले. सुरुवातीच्या टप्प्यात पेरणीसाठी शिवार झटपट तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाला शेतकऱ्यांनी कवटाळले. दिवसेंदिवस त्याची सवय शेतकऱ्यांना झाली आहे. मात्र, आता डिझेल दरवाढीने ट्रॅक्टरने मशागत करणे अडचणीचे ठरत आहे. डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने मशागतीचे दर वाढले असून, एकरी ८०० ते १००० रुपयांनी दरात वाढ केली आहे.
पूर्वीच्या काळात घरोघरी ‘बीज बँक’ कार्यरत होती. आपणाला वर्षाला लागणारे बियाणे घरी सुरक्षित साठवून ठेवले जात होते. उत्पादकता वाढीसाठी संकरित बियाणांच्या मागे शेतकरी लागले आणि ही बँक कधी मोडून पडली हे त्यालाच कळले नाही. आपण संकरित वाणांच्या इतक्या आहारी गेलो की आपल्या जमिनीत कोणते वाण पेरायचे हे विक्रेतेच ठरवू लागले. सुरुवातीच्या टप्प्यात उत्पादनात मोठी वाढ झाली हे जरी खरे असले तरी आता हेच संकरित वाण शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरू लागले आहेत.
कंपन्या लावेल त्या दराने बियाणे खरेदी करावे लागत आहे. महागडे बियाणे खरेदी करून ते शंभर टक्के उगवेलच असे नाही. भाताच्या विविध वाणांच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीनच्या दरातही किलोमागे ३० रुपयांची वाढ झाली आहे. एकूणच यंदाच्या खरीप हंगामात मशागत, बियाणे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार, हे मात्र निश्चित आहे.
असे आहेत रोटरने नांगरटीचे दर
काम | दर प्रती गुंठा |
नांगरट | १३० |
नांगरट करून सरी काढणे | २५० |
सरी फोडून उसाची भरणी | १५० |
जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र हेक्टरमध्ये
पीक | क्षेत्र |
भात | ९९ हजार ५०० |
भुईमूग | ५१ हजार |
सोयाबीन | ५० हजार |
नागली | २२ हजार |
ज्वारी, बाजरी | २५ हजार |
ऊस | १ लाख ७३ हजार |
डिझेलच्या दरात दुप्पट वाढ झाल्याने मशागतीच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्हीही शेतकरीच आहोत. मात्र, आज बाजारात कोणत्या वस्तूच्या दरात वाढ झालेली नाही, हे सांगा. - गणेश माळी (ट्रॅक्टर चालक)