खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन :श्रीपतराव शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 12:05 PM2020-12-10T12:05:22+5:302020-12-10T12:07:14+5:30
पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंबेओहोळ धरणग्रस्तांविरूद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी दिला.
गडहिंग्लज :पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंबेओहोळ धरणग्रस्तांविरूद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी दिला.
आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव यांच्यासह ७ प्रकल्पग्रस्तांविरूद्ध पाटबंधारे अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्याच्या निषेधार्थ येथील प्रांतकचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कॉ. संपत देसाई म्हणाले, संघटना आणि धरणग्रस्त यांच्यात एकवाक्यता नसल्यामुळे अधिकारी गैरफायदा घेतात. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने लढायला हवे.
कॉ. अशोक जाधव म्हणाले, आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची आढावा बैठक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत उचंगी व सर्फनाला प्रकल्पाचे कामही बंद ठेवले जाईल. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, जनता दलाचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, आजरा तालुकाध्यक्ष सदानंद व्हनबट्टे, कॉ. संजय तर्डेकर यांचीही भाषणे झाली.
पाणी मोजायला हवं..!
तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी उचंगी, आंबेओहोळ धरणात पाणी अडविण्याची घोषणा केली. परंतु, पुनर्वसनाचे प्रश्न तसेच राहिले. त्यामुळे धरणात किती पाणी साठलं आणि नेत्यांमध्ये किती पाणी आहे? हेही एकदा मोजायला हवे, असा टोलाही शिंदेनी हाणला.
मंगळवारी धरणस्थळी निर्धार परिषद
मंगळवारी (१५) दुपारी १२ वाजता आंबेओहोळ धरणस्थळी आंबेओहोळ, उचंगी व सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनासाठी निर्धार परिषद होईल. परिषद होईपर्यंत शासनाने आंबेओहोळचे काम थांबवावे, अन्यथा धरणग्रस्त काम बंद पाडतील, असा इशारा शिंदेंनी यावेळी दिला.