Kolhapur: "सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची अधिसुचना मागे घ्या"
By इंदुमती सूर्यवंशी | Published: June 20, 2024 06:26 PM2024-06-20T18:26:24+5:302024-06-20T18:27:56+5:30
ओबीसी जनमोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : अन्यथा विधानसभेला विरोधात मतदान
कोल्हापूर : मराठा कुणबीच्या सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची अधिसुचना मागे घ्या, मराठा मतांच्या बेगमीसाठी मनोज जरांगे यांच्या दबावाला बळी पडून राज्यशासन असंविधानिक व ओबीसीविरोधी मागण्या मान्य करणार असेल तर ओबीसींच्या रोषाला सामोरे जावे लागेल, विधानसभा निवडणुकीत ओबीसी सत्ताधाऱ्यांविरोधी मतदान करतील असा इशारा गुरुवारी ओबीसी जनमोर्चा संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिला.
तत्पूर्वी दिगंबर लोहार. सयाजी झुंजार. एकनाथ कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. यात राज्यातील नागरिकांची जातीनिहाय जनगणना करावी, महाज्योती संस्थेची जिल्हानिहाय कार्यालये तातडीने सुरू करावी, ॲड. मंगेश ससाणे, प्रा. लक्ष्मण हाके आणी नवनाथ आबा यांच्या आमरण उपोषणाची राज्य शासनाने दखल घ्यावी अशी मागणी केली.
तसेच गणगोत, सगेसोयरे असे शब्द कायद्यात बसवून काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यावर लाखो हरकती आल्या आहेत. अधिसूचनेतील संदिग्धतेमुळे जात प्रमाणपत्र व जात पडताळणीचे प्रमाणपत्र देणारे अधिकारी सरसकट मराठ्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्रे देतील. राज्य सरकारने मराठा जातीसाठी स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिल्याने सगेसोयऱ्यांबाबतच्या अधिसूचनेचा अट्टाहास चुकीचा आहे. सगेसोयरे, गणगोत, सजातीय अशा संदिग्ध शब्दांचा अंतर्भाव करून ओबीसींना मूर्ख बनवले जात आहे. त्यांची दिशाभूल करत फसवणूक केली जात आहे.
राज्य शासनाने जनतेची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव केला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, ओबीसी भटके विमुक्त, विशेष मागासप्रवर्ग तसेच अन्य समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच राजकीय स्थिती जाहीर करावी. महाज्योती संस्थेचे एकमेव मुख्यालय नागपूर असल्याने ते सर्वसामान्यांना गैरसोयीचे आहे. महाज्योती योजनांची माहिती सर्वच जिल्ह्यातील ओबीसींपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सारथी प्रमाणेच महाज्योती संस्थेचे सर्व जिल्ह्याच्या मुख्यालयात स्वतंत्र कार्यालय सुरू करावे अशी मागणी करत अन्यथा आपल्या सरकारला ओबीसीं, भटके विमुक्त, विषेश मागासप्रवर्गाच्या प्रचंड मोठ्या असंतोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवाजी माळकर. बाळासाहेब लोहार पी.ए. कुंभार, सुभाष गुरव, बाबासाहेब काशिद, सुनिल गाताडे, चंद्रकांत कोवळे, किशोर लिमकर, शितल मंडपे, योगेश कुंभार. पांडुरंग परीट. काशिनाथ माळी. धनाजी गुरव. डी. बी. सातार्डेकर, ज्योतिराव लोहार, रूपाली सातार्डेकर, मालती सुतार, राधा मेस्त्री आदी उपस्थित होते.