‘शक्तिपीठ’ची अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास माघार घेतो; हसन मुश्रीफ यांचे समरजीत घाटगे यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:43 PM2024-11-13T16:43:24+5:302024-11-13T16:45:01+5:30
हिम्मत असेल तर यावर बोला..!
सिद्धनेर्ली : शक्तिपीठ महामार्गाच्या रूपाने शेतकऱ्यांवर भूमिहीन होणार म्हणून सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करून कोल्हापुरातील शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना काढून घेतली. ही अधिसूचना खोटी आणि फसवी असल्याचा अपप्रचार समरजीत घाटगे करीत आहेत. त्यांनी ती अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास अजूनही निवडणुकीतून माघार घेतो, असे आव्हान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील सभेत ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सातव्यांदा निवडणूक लढवत आहोत. डबल हॅट्ट्रिक करण्याची संधी मला द्यावी, असे आवाहन करून ते म्हणाले, विकासाचे प्रचंड काम करून दाखविले आहे. राज्यात आमचे सरकार स्थापन होणार असून चांगले काम करण्याची पुन्हा आपल्याला संधी मिळणार आहे.
शुभांगी पाटील, सायली आगळे, भाजप तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. एम. बी. पाटील, व्ही. जी. पवार, राहुल महाडिक, विनायक आगळे, सरपंच दत्तात्रय पाटील, कृष्णात मेटील आदी. उपस्थित होते.
हिम्मत असेल तर यावर बोला..!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, सिद्धनेर्लीतील दलित समाजाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी साडेपाच एकर जमीन कसून खाण्यासाठी दिली होती. त्यामध्ये हा समाज संरक्षित कूळ होता. श्रीमंत बापूसाहेब महाराज, श्रीमंत बाळ महाराज, विक्रमसिंह घाटगे या सगळ्यांच्याच नावावर ही जमीन त्या-त्या कालखंडात होती. त्यांनी कधीही या संरक्षित कुळाला त्रास दिला नाही. परंतु; जमीन वारसा हक्काने समरजीत घाटगे यांच्या नावावर होताच ही जमीन का काढून घेतली..?