कोल्हापुरात दुकाने बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा
By admin | Published: June 5, 2017 05:09 PM2017-06-05T17:09:26+5:302017-06-05T17:09:26+5:30
केएमटी वाहतुकीवर परिणाम, शिवसेना आक्रमक
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0५ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व प्रकारची दुकाने संध्याकाळपर्यंत बंद होती. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत अनेक ठिकाणची दुकाने बंद करणे भाग पाडले. संध्याकाळी पाच नंतर दुकाने उघडण्यास सुरूवात झाली.
दोन दिवसांपुर्वीच महाराष्ट्र बंदचा निर्णय जाहीर झाल्याने व्यापाऱ्यांनीही सकाळी दुकाने उघडली नाहीत. शाहुपूरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, महाव्दार रोडवरील व्यवहार संपूर्ण बंद राहिले. रस्त्याकडेची बहुतांशी दुकाने बंद परंतू रस्त्यावरून नागरिकांची सुरू असलेली ये जा असे चित्र दिवसभर शहरात राहिले. शाळांना सुट्टीच असल्याने या परिसरात शुकशुकाट राहिला.
सकाळी महामार्गावरचे आंदोलन झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजराव जाधव, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, रवि चौगुले यांनी महापालिका परिसर, पानलाईन, चप्पललाईन येथे सुरू असलेली काही दुकाने बंद करणे भाग पाडले.
आक्रमक पध्दतीने हे पदाधिकारी धावून गेल्याने सुरू असलेलीही दुकाने बंद करण्यात आली. बाराच्या सुमारास गंगावेशकडून येणारी केएमटी बस थांबवून शिवसैनिकांनी प्रवाशांना खाली उतरवले. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने मोठ्या संख्येने मोटर सायकल मात्र रस्त्यावर दिसत होत्या. अनेक मार्गांवरून केएमटी बसेस रिकाम्या धावत असताना दिसत होत्या.
खेड्यातून येण्याचेच टाळले
रोज सकाळी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शहरात येतो. अनेक शेतकरी, महिलाही महाव्दार रोडवर, शिंगोशी मार्केटमध्ये भाजी विकण्यासाठी येतात. मात्र अनेकांनी कोल्हापुरात येणेच टाळल्याने सकाळी या परिसरात शांतता जाणवत होती.