निकाल राखून ठेवल्याने याचिकाकर्त्या गावांमध्ये धाकधूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:27 AM2021-02-11T04:27:09+5:302021-02-11T04:27:09+5:30
कोल्हापूर: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ९ गावांतील वादग्रस्त सरपंच आरक्षणावरील सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारीच पूर्ण झाली. पण निकाल राखून ठेवल्याने ...
कोल्हापूर: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ९ गावांतील वादग्रस्त सरपंच आरक्षणावरील सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारीच पूर्ण झाली. पण निकाल राखून ठेवल्याने याचिकाकर्त्या गावांमध्ये धाकधूक वाढली आहे. मंगळवारी ८ गावांची आणि बुधवारी तमदलगे या एका गावाची सुनावणी प्रक्रिया जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर पार पडली.
सरपंच आरक्षण सोडतीत रोटेशनचा नियम मोडल्याचा आक्षेप घेत कोगे, उंड्री, फणवाडी, खुपिरे, शिरटी, मजरेवाडी, गिरगाव, तळेवाडी, तमदलगे या गावांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने यावरील निर्णय जिल्हाधिकारीच घेतील असे सांगून, मंगळवार (दि. १६)पर्यंत या नऊ गावांसह शिरोळ, शाहुवाडी, गडहिंग्लज, करवीर, भुदरगड, पन्हाळा या तालुक्यांतील २६५ गावांतील सरपंच निवडीच स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या नऊ गावांचा निकाल काय लागतो, याकडे या संपूर्ण २६५ गावांचे लक्ष लागले आहे.
बुधवारी निकाल दिला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत याची पडताळणी करण्याचे काम निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाो गलांडे यांच्या उपस्थितीत सुरू होते. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, निकालाची प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याचे सांगितले.
दरम्यान, मंगळवारी घेतलेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांना न बोलवता संपूर्ण ग्रामपंचायतीलाच बोलावले होते. यावरून याचिकाकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.