शंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:37 PM2019-03-01T13:37:36+5:302019-03-01T13:39:14+5:30

ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत.

Within 100 days, the Dhuradi of nine factories in the district stopped | शंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली

शंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली

googlenewsNext
ठळक मुद्देशंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावलीउर्वरित १३ कारखानेही पंधरा दिवसांच्या आत बंद होणार

कोल्हापूर : ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत.

उर्वरित १३ पैकी तीन-चार कारखान्यांचा अपवाद वगळता सर्व कारखाने या आठवडाभरातच हंगाम गुंडाळणार आहेत. यामुळे यंदा जेमतेम १२० दिवसांचाच हंगाम होणार आहे. एकरकमी ‘एफआरपी’वरून शेतकरी संघटनेचा दबाव आणि साखर उद्योगाविषयीचा सरकारचा धोरणलकवा यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून सुरू असलेला अडचणीचा डोंगर सांगतेलाही कायम राहिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘दौलत’ वगळता उर्वरित २२ कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. साधारपणे १२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत कारखान्यांनी प्रत्यक्षात गाळपास सुरुवात केली. दरम्यान प्रतिदिन गाळपक्षमता वाढली तरी आंदोलनामुळे कारखान्यांचे गाळप मधले काही दिवस बंद ठेवावे लागले. तरीही त्यानंतर वेग घेत कारखान्यांनी हंगाम रेटत आणला.

गेल्या वर्षी शाहू, जवाहर, गुरुदत्त, दत्त-शिरोळ या कारखान्यांचे हंगाम २ ते २४ एप्रिल या कालावधीत संपले होते. उर्वरित कारखाने ८ ते २५ मार्च या कालावधीत संपले होते. यावर्षी पंचगंगा हा एकमेव कारखाना २५ मार्चपर्यंत चालणार आहे. उर्वरित दत्त- शिरोळ, जवाहर, गुरुदत्त, शाहू, वारणा, बिद्री, शरद, मंडलिक, दालमिया हे प्रमुख कारखानेदेखील १५ दिवसांतच हंगाम गुंडाळणार आहेत.

...म्हणून हंगाम लवकर आटोपला

या वर्षी जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होता; पण जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाची वाढ खुंटली. परिणामी उसाचे क्षेत्र वाढूनही एकरी उतारा निम्म्यापेक्षाही कमी झाला. गाळपासाठी गुणवत्तेचा ऊसच उपलब्ध नसल्याने गाळपाचा हंगाम लवकर आटोपला आहे.

साधारपणे किमान १६० दिवस हंगाम चालला तरच साखर कारखान्यांना फायदा मिळतो. यापेक्षा कमी दिवस हंगामाचे झाले तर उत्पन्न तर कमी मिळतेच; शिवाय देखभालीचा खर्चही अंगावर पडत असल्याने साखर उद्योगाच्या तोट्यात भरच पडते. आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देण्याचीही क्षमता कारखान्यांकडे राहिलेली नाही. सरकारने मदतीसाठी आधीच हात वर केले आहेत. त्यामुळे हंगाम संपला तरी एफआरपीचा तिढा कायम राहणार आहे.

आजअखेर बंद झालेले कारखाने
भोगावती, राजाराम, गडहिंग्लज, आजरा, डी. वाय. पाटील, अथणी शुगर्स, हेमरस, महाडिक शुगर्स.
 

 

Web Title: Within 100 days, the Dhuradi of nine factories in the district stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.