पत्नीच्या निधनानंतर तासाभरात पतीने सोडले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:22 AM2021-04-05T04:22:12+5:302021-04-05T04:22:12+5:30
आजरा : मृत्यू हा कोणालाही चुकला नाही...नव्हे तो चुकविताही येत नाही..लग्नानंतर जवळपास ६९ वर्षे एकमेकांवर जिवापाड प्रेम..पत्नीच्या आठ दिवसांच्या ...
आजरा : मृत्यू हा कोणालाही चुकला नाही...नव्हे तो चुकविताही येत नाही..लग्नानंतर जवळपास ६९ वर्षे एकमेकांवर जिवापाड प्रेम..पत्नीच्या आठ दिवसांच्या आजारपणात पतीकडून अन्नपाणी वर्ज..पत्नीचा उपचार सुरू असतानाच मृत्यू. पत्नीच्या निधनानंतर पतीने सोडला तासाभरातच प्राण..मडिलगे (ता. आजरा) येथील इंगळे कुटुंबियांवर एकाच दिवशी आई-वडिलांच्या निधनाने आभाळ कोसळले. मात्र, एकमेकांत जीव गुंतलेल्या पती-पत्नीचा तासाभरातील मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला आहे.
मडिलगे येथील दत्तू दाजी इंगळे (वय ९३) व तानूबाई दत्तू इंगळे (वय ८७) यांचा सुखाचा संस्कार गेले ६९ वर्षे सुरू होता. एकमेकांवर भरपूर प्रेम. दोन मुले व तीन मुलींचे लग्न केल्यानंतर शेतातील घरात राहून मुलांचा संसार सुखाचा होण्याची स्वप्न पाहत आयुष्य जगणे सुरू होते.
१५ दिवसांपूर्वी भावजयीचा झालेल्या मृत्यूचा धसका तानूबाईने घेतला आणि तिला रक्तदाबाचा त्रास सुरू झाला.
मुलगा बबन मुंबईहून गावी आले व आईला कोल्हापुरात सी.पी.आर.मध्ये दवाखान्यात ठेवले. कोरोना अहवाल निगेटिव्ह. आई लवकर बरी होणार व गावी घेऊन जायचे ही स्वप्ने पाहत असतानाच नियतीने अघटितच घडविले. दत्तू इंगळे यांना डोळ्याने गेल्या आठ वर्षांपासून दिसत नसल्याने पत्नी तानूबाई व सुनेच्या आधारावर दिनक्रम सुरू होता.
शनिवारी दुपारी तानूबाईचा मृत्यू झाला. दत्तू इंगळे यांना माहिती समजताच आठ दिवसांपासून अन्न-पाणी सोडलेल्या पतीनेही जगाचा निरोप घेतला. एकमेकांवरील अतूट प्रेमाची ही कहाणी. दोघांवरही रात्री उशिरा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत इंगळे वसाहती शेजारील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
* दत्तू इंगळे : ०४०४२०२१-गड-०६
* तानूबाई इंगळे : ०४०४२०२१-गड-०७