‘फॅन्सी’ नंबरपोटी तीन महिन्यांत साडेपाच कोटी
By admin | Published: August 13, 2016 12:07 AM2016-08-13T00:07:06+5:302016-08-13T00:36:54+5:30
‘प्रादेशिक परिवहन’ मालामाल : आवडत्या क्रमांकासाठी मोजले दोन हजारांपासून १२ लाख रुपये
सचिन भोसले - कोल्हापूर-कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत चार उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये केवळ तीन महिन्यांत फॅन्सी नंबरपोटी साडेपाच कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. अशा पद्धतीने जमा झालेली रक्कम मोठ्या शहरांच्या मानाने विक्रमी मानली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात दुचाकी, चारचाकी गाडीला चांगला आकर्षक नंबर हवाच, असा अट्टाहास बऱ्याच लोकांचा असतो. मग ट्रक असला तरी त्या ट्रकला अमूकच नंबर हवा म्हणून त्यापोटी पाच हजार ते दीड लाख रुपये मोजणारे लोक आहेत. त्यात १, ५, ७, ९, ११, २५, ९९, १२३, १११, २५२६, ९२९२, १२३४, अशा आकर्षक क्रमांकाला तर म्हणेल ती बोली लिलावात बोलली जाते.
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आकर्षक नंबरसाठी लिलाव आयोजित केला जातो. त्यात अनेक हौशे-नवशे जातीनिशी आकर्षक क्रमांकाला बोली बोलतात आणि हवा तो क्रमांक आपल्याच पदरी पाडण्यासाठी इर्षा करतात, असे चित्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाहण्यास मिळते. त्याचा परिपाक म्हणून एप्रिल ते जुलै २०१६ अखेर कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ५ कोटी ३७ लाखांचा महसूल गोळा झाला आहे. हा जमलेला महसूल इतर मोठ्या शहरांच्या मानाने जादाचा असल्याने हा एक विक्रमच ठरला आहे. त्यामध्ये दुचाकीचा क्रमांक चारचाकीला हवा असेल तर ठरलेल्या किमतीपेक्षा जादा पैसे लिलावात मोजावे लागतात. अशा प्रकरणांमध्ये कोल्हापुरात एका वाहनधारकांने तब्बल १२ लाख रुपये मोजले आहेत. या जमा महसुलात आकर्षक क्रमांकाच्या प्रेमापोटी काही हौशी वाहनधारकांनी अगदी २००० पासून ३ लाख रुपयांपर्यंत रक्कम मोजली आहे.
पारदर्शी यंत्रणेमुळे इतका महसूल जमा झाला आहे. त्यामध्ये दर महिन्याला फॅन्सी नंबरसाठी लिलाव आयोजित केला जातो. त्यात सर्वांना समान संधी दिली जाते. अमूक एका नंबरसाठी ज्याची बोली उच्च असेल त्याला तो नंबर दिला जातो.
- लक्ष्मण दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत जमा झालेला महसूल पुढीलप्रमाणे
कार्यालयक्रमांक प्रकरणेजमा रक्कम
कोल्हापूर२६१३२,१३,०,५०००
सांगली२४२४१,८६,१०,०००
सातारा११८११,०८,७४,०००
कराड५५०२९,१२,०००
एकूण६७६८५,३७,०१,०००