'गर्भवती मातांनो कोरोनाची लस घ्या, अन्यथा...', संशोधनातून मोठा खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 01:11 PM2021-12-15T13:11:03+5:302021-12-15T13:12:02+5:30
प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की, डॉ. सुह्रदय पत्की व डॉ. आर. एस. पाटील यांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रसूती झालेल्या सोळा महिलांवर बाळाच्या जन्मानंतर मिळणाऱ्या वारेच्या सखोल अभ्यासा अंती हे संशोधन केले आहे.
कोल्हापूर : गरोदरपणाच्या अगोदर किंवा त्याकाळात कोविड लस न घेतल्यास गर्भाशयामध्ये बाळाला रक्तपुरवठा कमी होतो. परिणामी बाळाची वाढ खुंटते व कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याचा धोका संशोधनातून पुढे आला आहे. येथील प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की, डॉ. सुह्रदय पत्की व डॉ. आर. एस. पाटील यांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रसूती झालेल्या सोळा महिलांवर बाळाच्या जन्मानंतर मिळणाऱ्या वारेच्या सखोल अभ्यासा अंती हे संशोधन केले आहे. महिलांसाठी कोविड लसीकरण किती महत्त्वाचे आहे हेच त्यातून अधोरेखित झाले आहे.
गरोदरपणामधील कोविड संक्रमणामधून बरे झालेल्या वारेची इम्युनोकेमिस्ट्री व इलेक्ट्राॅन मायक्रोस्कोपी या तंत्रज्ञानाच्या आधारे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कोविड विषाणूचा आईच्या रक्तामधून बाळामध्ये प्रवेश होण्याची शक्यता नगण्य असल्याचे स्पष्ट झाले. परंतु वारेतून बाळाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचे प्रमाण आहे. गर्भजलाचे प्रमाण कमी होऊ शकते. गरोदर महिलेला कोविड संक्रमणास सामोरे जावे लागले तर मातेबरोबर बाळाला ही काही प्रसंगी मृत्यूचा धोका उद्भवू शकतो असे या संशोधनातून पुढे आले आहे.
गरोदर महिलेस कोरोना झाल्यास अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. गरोदरपणामध्ये ज्या गोष्टी टाळल्या जातात त्याच कराव्या लागतात. सीटी स्कॅन, रेमडेसिवीर व प्रति जैविक औषधांचा अतिरिक्त वापर करावा लागतो. प्रसूतीच्या काळातच कोविड झाला तर प्रसूती अतिदक्षता विभागात करावी लागते. त्यामुळे कोरोना संक्रमण मधून पूर्णपणे बरे झाल्यानंतर प्रसूती झाली तर बाळाला काही धोके निर्माण होतात का हे या संशोधनात तपासले. हे संशोधन आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. सर्वोत्कृष्ट संशोधनाचा पुरस्कारही पत्की रुग्णालयास मिळाला आहे.
गरोदर महिलेमध्ये कोविड संक्रमण होऊ न देणे हितकारक आहे. जर पूर्वी लस घेतली नसल्यास गरोदरपणामध्ये अशी लस घेणे किती महत्त्वाचे आहे हेच या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे माता भगिनींनी मनातील संभ्रम दूर करून लसीकरणास पुढे यावे. - डॉ. सतीश पत्की, प्रसिद्ध प्रसूती तज्ज्ञ कोल्हापूर.