पन्हाळा तालुक्यात सात शाळा शिक्षकांविना ; जिल्हा परिषदेची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:42 AM2019-06-30T00:42:57+5:302019-06-30T00:44:38+5:30
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दहा दिवस होऊन गेले तरी तालुक्यातील सात शाळा शिक्षकांविना आहेत, तर तब्बल ११४ शिक्षक कमी असल्याने व मुलांना गणवेशासाठी फक्त ९९ रु. ३३ पैसे दिल्याने जिल्हा परिषदेची शैक्षणिक उदासीनता दिसू लागली आहे.
पन्हाळा : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दहा दिवस होऊन गेले तरी तालुक्यातील सात शाळा शिक्षकांविना आहेत, तर तब्बल ११४ शिक्षक कमी असल्याने व मुलांना गणवेशासाठी फक्त ९९ रु. ३३ पैसे दिल्याने जिल्हा परिषदेची शैक्षणिक उदासीनता दिसू लागली आहे. तालुक्यातील शेलारवाडी, सुर्वेवाडी, नवलेवाडी, खोतवाडी, कोतमीरवाडी, बांदीवडे, वाशी या सात शाळेत शिक्षकच नाहीत. येथील मुलेच शाळा उघडतात आणि बंद करतात. या शाळांमध्ये अजून पुस्तकच उघडलेले नाही.
समग्र शिक्षा अभियानांर्तगत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुली ८२५१, अनुसूचित जमातीची मुले १५, अनुसूचित जातीतील मुले १२४०, दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले ५६१, अशा एकूण १०,०६७ मुलांना गणवेशासाठी ६०४०२०० रुपये अनुदान स्वरूपात पन्हाळा तालुक्यासाठी शासनाकडून मंजूर झालेले आहेत; पण प्रत्यक्षात दहा लाख रुपये अनुदान आल्याने या मुलांना गणवेशासाठी सहाशे रुपये लागतात. पण, अनुदान कमी आल्याने केवळ ९९ रु. ३४ पैसे देऊन यापुढे पैसे आले तर देऊ, असे सांगून बोळवण केली आहे. मुळातच ही सर्वच मुले गरीब आहेत. मग, सहाशे रुपयांचे दोन गणवेश त्यांच्या पालकांकडून खरेदी केले जातील, अशी अपेक्षा करणेही चुकीचे ठरते आहे. एकूणच पन्हाळा तालुका डोंगराळ आणि दुर्गम व भरपूर पाऊस पडणारा आहे. याला वरील सर्वच परिस्थितीने शैक्षणिक उदासीनतेची किनार लागल्याने खासगी शाळांचे तालुक्यात रोज नवे पेव फुटताना दिसत आहे.
तालुक्यात एकूण ११४ पदे रिक्त
पन्हाळा तालुक्यात १९४ शाळांसाठी ५९६ शिक्षक पदे मंजूर आहेत. यामध्ये ७७ अध्यापक, २९ पदवीधर शिक्षक व आठ मुख्याध्यापक म्हणजे एकूण तब्बल ११४ पदे रिक्त आहेत. यातूनच निवडल्या गेलेल्या १६ ठिकाणी केंद्र शिक्षकच नाहीत.