पुलाचे बांधकाम न करताच पैसे उचलले
By admin | Published: September 16, 2014 10:37 PM2014-09-16T22:37:19+5:302014-09-16T23:26:02+5:30
शाहूवाडी तालुक्यातील प्रकार : ४५ लाख रुपये उचलल्याचे माहिती अधिकारात उघड
नवे पारगाव : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावर शाहूवाडी तालुक्याच्या हद्दीत धोक्याच्या ठिकाणी दोन पुलांची बांधकामे पूर्ण न करताच ४५ लाख४० हजार रुपये रक्कम उचलली गेली असल्याची घटना उघडकीस आली. सार्वजनिक बांधकाम विभागातील एका सहायक अभियंत्याने माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितल्याने ही बाब उजेडात आली. राज्याचे आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी सा. बां. विभागाच्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, राज्य अपघात निवारण समितीचे सचिव तांबे यांनी ४ ते ५ आॅगस्ट २००० मध्ये रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी केली. राज्याच्या अपघात निवारण समितीचा अहवाल हा सा. बां. विभागासाठी आदेश मानला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील करंजोशी ते बहिरेवाडी (ता. शाहूवाडी) खिंड दरम्यानच्या दोन ठिकाणी अरुंद रस्ते व अत्यंत धोकादायक वळणाच्या ठिकाणी पूल बांधकामाच्या सूचना अपघात निवारण समितीने दिल्या होत्या. सा. बां. विभागाने प्रथम प्राधान्याने व तत्काळ हे काम करण्याचे निर्देश दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम कागदावरच केले. या दोन्ही ठिकाणी पुलाच्या कामासाठी अनुक्रमे ३० लाख ३५ हजार व १५ लाख ५ हजार खर्ची पडले आहेत. प्रत्यक्षात ही कामे झालेलीच नाहीत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील एका सहायक अभियंत्याने माहितीच्या अधिकाराखाली २१ जुलै २०१० रोजी माहितीची मागणी अपिलीय प्राधिकाऱ्याकडे मागितली. प्रत्यक्षात काम न करताच रक्कम उचलली गेल्याने गेली. चार वर्षे बांधकाम विभाग माहिती देऊ शकले नाही. शेवटी अपीलकर्त्याने राज्य माहिती आयुक्तांकडे धाव घेतली.
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी राज्याच्या बांधकाम विभागाच्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले. आदेशात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधितांविरुद्ध जबाबदारी निश्चित करावी, दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी व अपीलकर्त्यास तत्काळ माहिती द्यावी.
या न झालेल्या कामाचे ४५ लाख ४० हजार उचलले गेल्याने कशी माहिती सादर करायची याबाबत सा. बां. विभाग चांगलाच गोत्यात आला आहे. त्यांच्याच विभागातील एकाने भ्रष्टाचाराविरुद्ध एक पाऊल पुढे टाकल्याने या विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.
बांधकाम विभागात सेवा करीत असताना गेली २९ वर्षे या विभागातील गैरप्रकार व भ्रष्टाचाराबद्दल एकाकी लढणाऱ्या ‘त्या’ सहायक अभियंत्याने माहिती मागितल्याने व चौकशी सुरू झाल्याने त्यांना त्रास देणे सुरू केले आहे. पदोन्नतीचे कारण दाखवून त्या अभियंत्याची अखेर नागपुरात बदली केली आहे. (वार्ताहर)