‘ताराराणी’शिवाय भाजप स्वतंत्र लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 01:31 AM2020-02-28T01:31:34+5:302020-02-28T01:33:00+5:30
प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बसून या संदर्भात चर्चा केली जाईल, तसेच रणनीती ठरविली जाईल, असे महाडिक यांनी स्पष्ट केले. तर भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यामध्येही निवडणुकीबाबतीत सविस्तर चर्चा केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले.
भारत चव्हाण ।
कोल्हापूर : महानगरपालिकेची गतवेळची पंचवार्षिक निवडणूक महाडिक प्रणित ताराराणी आघाडीबरोबर लढणा-या भारतीय जनता पक्षाने यावेळी मात्र पूर्ण ताकदीने ‘ताराराणी’शिवाय लढण्याचा निर्धार केला असून, लवकरच याबाबतची रणनीती निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे सोयीने उमेदवारी मिळविणा-या उमेदवारांना यंदा भाजपचे सदस्यत्व स्वीकारूनच निवडणूक लढवावी लागेल.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. मे महिन्यात सर्व ८१ प्रभागांतील आरक्षणे जाहीर होणार आहेत. आरक्षणे निश्चित झाली की निवडणूक लढविण्याच्या संदर्भात पूर्ण ताकदीने तयारी केली जाईल. केवळ आठ महिनेच राहिल्यामुळे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर माहिती संकलित करणे, निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी करणे अशी तयारी सुरू आहे.
गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाडिक प्रणित ताराराणी आघाडी यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुसंवाद होता. ताराराणी आघाडीने सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजपचे उमेदवार तुलनेने कमी होते. पहिल्याच प्रयत्नात भाजपने १३, तर ‘ताराराणी’ने १९ जागा जिंकल्या. नंतर मनसेच्या एक नगरसेवकाने भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले; त्यामुळे निवडणुकीनंतर झालेल्या आघाडीचे संख्याबळ ३३ पर्यंत पोहोचले. सत्तेपर्यंत पोहोचण्यास केवळ सात जागा कमी पडल्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीने विरोधी पक्षाची भूमिका बजावली. अधूनमधून तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चमत्काराची भाषा केली; पण त्यांना ते शक्य झाले नाही.
गतवेळची पार्श्वभूमी लक्षात घेता यावेळी ताराराणी आघाडीदेखील स्वतंत्र अस्तित्व ठेवील असे वाटत होते; परंतु आता महाडिक परिवार भाजपवासी झाल्यामुळे निवडणुकीत ताराराणी आघाडीला न उतरवता भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी, असा सूर उमटत आहे. गुरुवारी या माहितीला माजी खासदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष धनंजय महाडिक व पश्चिम महाराष्टÑ देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दुजोरा दिला. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बसून या संदर्भात चर्चा केली जाईल, तसेच रणनीती ठरविली जाईल, असे महाडिक यांनी स्पष्ट केले. तर भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यामध्येही निवडणुकीबाबतीत सविस्तर चर्चा केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले.
भाजपची ताकद वाढविण्याचा प्रयत्न
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मागच्या निवडणुकीवेळी राज्यात सत्तेत असूनही भाजपपेक्षा ताराराणी आघाडीकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे भाजप सर्वार्थांनी सक्षम असूनही ताराराणी आघाडीसोबत फरफटत गेला. ही परिस्थिती या निवडणुकीवेळी बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे; म्हणून ‘ताराराणी’चे अस्तित्व निवडणुकीपासून दूर ठेवण्यात येणार आहे.
मग भाजप हाच पर्याय
महापालिकेच्या निवडणुकीत काही विशिष्ट प्रभागांत भाजपचे मतदान आहे. त्या ठिकाणी उमेदवारी मागण्यास उमेदवार इच्छुक असतात; पण जेथे भाजपचे मतदान नाही तिथे मात्र उमेदवारी मागण्यास कोणी धजत नाही. त्या ठिकाणी उमेदवारांना ताराराणी आघाडीचे पर्याय मिळतो; पण जर यावेळी ते अलिप्त राहिली तर इच्छुकांना भाजप हाच पर्याय असेल.