त्रिपक्षीय करार झाल्याशिवाय धुराडी पेटू देणार नाही : मजुरी ३७८ रुपये करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:59 PM2018-10-01T16:59:20+5:302018-10-01T17:00:50+5:30
ऊस तोडणी मजूरांच्या मजुरी वाढीसह वाहतूक दरात वाढ करण्याबाबतचा त्रिपक्षीय करार होणार नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांनी दिला.
कोल्हापूर : ऊस तोडणी मजूरांच्या मजुरी वाढीसह वाहतूक दरात वाढ करण्याबाबतचा त्रिपक्षीय करार होणार नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांनी दिला.
ऊस तोडणी मजूरांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून निघालेला मोर्चा दुपारी एक वाजता सहसंचालक कार्यालयावर धडकला. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रभारी प्रादेशिक उपसंचालक डी. एस. खांडेकर यांना देण्यात आले.
यावेळी महाराष्ट ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, ऊस तोडणी व वाहतूकदारांच्या दरात वाढ करण्याची मागणी गेले वर्षभर आम्ही करत आहे. ऊस तोडणी यंत्राला टनाला चारशे रुपये दिले जाते आणि मजूराला २२८ रुपये हा कोणता न्याय, ही मजुरी किमान ३७८ रुपये करावी, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.
याबाबत २२ सप्टेंबरला राज्य साखर संघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली, ते सकारात्मक आहेत. पुढच्या बैठकीची वाट न पाहता मजुरीत वाढ केली पाहिजे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ऊस वाहतूक परवडत नाही; त्यामुळे किमान ५० टक्के वाहतूक दरात वाढ करावी. स्थानिक ४० हजार, तर परजिल्ह्यातील ६० हजार, असे एक लाख ऊस तोडणी मजूर कोल्हापूर जिल्ह्यात असल्याचे जाधव यांनी सांगितले.
तोडणी व वाहतूक दरात वाढ झाल्याशिवाय विळा अथवा कोयत्याला हात घालायचा नाही. त्रिपक्षीय करार तोही तीन वर्षांचा केला पाहिजे, त्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी प्रा. आबासाहेब चौगले, विलास दिंडे, दिनकर आदमापुरे, आनंदा डाफळे, बाबासो कुरुंदवाडे, आदी उपस्थित होते.
गुरुवारी कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
ऊस तोडणी व वाहतूक दरवाढीबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांसमवेत गुरुवारी (दि. ४) दुपारी तीन वाजता साखर सहसंचालक कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांसमवेत शुक्रवारी (दि. ५) बैठक आहे.
या आहेत मागण्या :
ऊस तोडणीच्या दरात ४०, तर वाहतुकीच्या दरात ५0 टक्के वाढ करा.
मुकादमाचे कमिशन दर २० टक्के करा.
माथाडी बोर्डात तातडीने नोंदणी करा.
मजूर व बैलजोडीचा विमा लागू करा.